• Sat. Jul 5th, 2025

मोफत अन्नधान्य वाटप योजनेसाठी शरदचंद्रजी पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणार चर्चा – छगन भुजबळ

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पुढील तीन महिने मोफत अन्नधान्य वाटप सुरु ठेवण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्यासाठी छगन भुजबळ यांनी घेतली शरदचंद्रजी पवार यांची भेट

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) कोविड – १९ प्रादुर्भावामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतीशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात येत आहे. मात्र अद्यापही देशात कोरोनाचा धोका कायम असल्याने अजून गोरगरीब नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे या योजनेस जुलै ते सप्टेंबर २०२० या कालावधीत मुदतवाढ
देण्याबाबत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी यासाठी आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. आज याबाबत शरदचंद्रजी पवार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून मोफत अन्नधान्य योजनेस पुढील तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी यापूर्वीच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न, पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांच्याकडे केली आहे. त्यानंतर आज ना.छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची भेट घेऊन त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करावी अशी त्यांना विनंती केली आहे.छगन भुजबळ यांनी शरदचंद्रजी पवार यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोविड-१९ या विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात तसेच विविध राज्यांमध्ये चालू असलेल्या लॉकडाऊन काळात अन्न धान्य मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. सदर परिस्थितीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (पीएमजीकेएवाय) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत एप्रिल ते जून २०२० या कालावधीत प्रती माह प्रती लाभार्थी ५ किलो प्रमाणे तांदूळ आणि प्रती कुटुंब प्रती माह तूर डाळ असे अतिरिक्त अन्नधान्य पुरविण्यात आले.यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की,शासनाच्या वतीने जनजीवन सुरळीत करण्याच्या दृष्टीने अनलॉक प्रक्रिया जरी सुरु केलेली असली तरी देशातील अर्थचक्राला गती येण्यासाठी आणि सामान्य नागरिकांचे जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होण्यासाठी अजून काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.संपूर्ण व्यवहार आणि जनजीवन अजून पूर्णपणे सुरळीत सुरु झालेले नाहीत. त्यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या अतिरिक्त धान्य पुरवठ्याचा कालावधी पुढील जुलै ते सप्टेंबर २०२० असे तीन महिने वाढवण्यासाठी राज्य शासनाने दि.१८ जून २०२० रोजी केंद्र शासनाकडे मागणी केलेली आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सुरु असलेला मोफत धान्य वितरणाचा कार्यक्रम जुलै ते सप्टेंबर २०२० या तीन महिन्यांच्या कालावधीत सुरू ठेवण्यासाठी आपल्या स्तरावरून केंद्र शासनाकडे प्रयत्न करावा असे छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.