• Sat. Jul 5th, 2025

पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही; दिशाभूल केल्यास कारवाई करणार

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा इशारा
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजली ने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.

या औषधामुळे कोरोना बरा होतो असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण करुन त्यांची दिशाभूल होत आहे. प्रत्यक्षात पतंजली ने तयार केलेले औषध कोरोनील हे अश्वगंधा ,तुळस व गुळवेल वापरून तयार केलेली गोळी (tablet) असून तिचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होतो. आयुष मंत्रालयाने सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वरील औषधाची अश्वगंधा, तुळस, गुळवेल हे घटक समाविष्ट असल्याने शिफारस केली आहे.प्रत्यक्षात यामुळे कोरोना बरा होत नाही.

कोरोनील हे औषधासाठी दिलेले नाव (कोरोना+निल) व प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिरातीमुळे जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण होत आहे. कोरोनीलचा वापर फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही याची नोंद जनतेने घ्यावी, असे आवाहनही डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.