सहा लाख ४६ हजार बॉटल्सची निर्मिती पूर्ण जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) कोरोनाच्या आपत्तीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांना आधार देण्यासाठी होमीओपथी डॉक्टरांशी चर्चा करुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्गदर्शनाखाली कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांचे श्रमदानातून, दानशूर व्यक्तींचे योगदानातून आणि रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने जिल्ह्यातील जवळपास ४५ लाख लोकसंख्येस म्हणजेच अंदाजे ११ लाख ५० हजार कुटुंबांना मोफत वाटपासाठी अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपथी औषधाच्या आतापर्यंत ६ लाख ४६ हजार बॉटल्सची निर्मिती पूर्ण झाली आहे. त्याचे वाटपही सहा तालुक्यात सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव तथा इंन्सिडंट कमांडर प्रतिबंधात्मक उपाययोजना गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झालेल्या जवळपास ७५ ते ८० टक्के रुग्णांना अत्यंत सौम्य किंवा कोणतीही लक्षणे दिसत नसून त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे ते सहज या आजारावर मात करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जे विविध उपाय सुचविलेले आहेत. त्यामध्ये अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपथी औषधाचा समावेश आहे. या औषधाची अचानक मागणी वाढल्यामुळे व पुरवठा कमी प्रमाणात असल्यामुळे औषधाच्या एका बॉटल्सची किंमत १५ रुपयापासून ५० रुपयापर्यंत वेगवेगळ्या मेडिकल स्टोअर्समध्ये आकारली जात होती.
यामुळे, कोरोनाच्या या आपत्तीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांना आधार देण्यासाठी होमिओपथी डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांच्या श्रमदानातून, दानशूर व्यक्तींचे योगदानातून रेडक्रॉस संस्थेच्या सहकार्याने आतापर्यंत ६ लाख ४६ हजार बॉटल्स औषधांची निर्मिती करण्यात आलेली आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ही औषधे कंटेन्मेंट झोन, झोपडपट्टी भागात, दाटीवाटीचा परिसर, कोव्हीड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटर, कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजना करणा-या अधिकारी, कर्मचारी यांना तसेच भुसावळ, पारोळा, धरणगाव, एरंडोल, चोपडा, यावल तालुक्यातील शंभर टक्के नागरीकांना मोफत वाटप सुरु आहे. तर उर्वरित तालुक्यामध्ये येत्या ७ दिवसांमध्ये वाटप पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जवळपास ११ लाख ५० हजार कुटुंबांना अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्यामार्फत घरोघरी जावून वाटप करण्यात येत आहे. औषध कसे घ्यावे यासंदर्भाने माहितीपत्रकही सोबत वाटप करण्यात येत आहे. औषध वाटपाचे नियोजन उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग यांचेमार्फत सुरु आहे.
रेडक्रॉस या संस्थेमार्फत औषध तयार करण्यासाठी लागणा-या साहित्याची खरेदी, देणगीचा हिशोब, भोजन, चहा पाण्याची व्यवस्था व इतर व्यवस्था करण्यात येत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांचे श्रमदानामुळे औषधी निर्मितीचा खर्च अत्यंत कमी म्हणजे सर्वसाधारणपणे १ रुपया ५ पैसे प्रतिकुटूंब येत आहे, असे इंन्सिडंट कमांडर गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.