• Sat. Jul 5th, 2025

कर्तव्य म्हणून सेवा करा, उपकार म्हणून नको

रोटरी क्लबच्या ऑनलाइन पदग्रहण सोहळ्यात प्रा. अरुणभाई गुजराथी यांचे आवाहन

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) आपण कधीही कर्तव्य म्हणून एखादी सेवा करायला हवी. उपकार म्हणून सेवा करू नका, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी केले. येथील रोटरी क्लबचा ५० वा पदग्रहण सोहळा ११ जुलै रोजी ऑनलाइन झूम मीटिंगद्वारे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

मी ५० व्या पदग्रहण सोहळ्याचा साक्षीदार आहे व सदर कार्यक्रमाची संधी मिळणे माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. कोविड किती दिवस चालेल कोणी सांगू शकत नाही पण वेबिनार, ऑनलाइन याद्वारे आपण आपले अटॅचमेंट, आपली सामाजिक बांधिलकी जोपासूया आणि निरंतर काम करत राहू या, असे आवाहनही प्रा. गुजराथी यांनी केले.

सर्वांना सोबत घेऊन चला

सेवा करताना आत्मविश्वास असावा. बदललेल्या अवस्थेत आणि व्यवस्थेत आपल्याला काम करावे लागेल. गरज लक्षात घेऊन प्रकल्प राबवावेत. रोटरी ही सेवाभावी संस्था आहे आणि चोपडा रोटरीने अत्यंत प्रभावी काम केलेले आहे. गौतम बुद्धांनी आपल्याला सेवेचे खरे रूप व व्रत समाजाला दिले आहे. काम करताना सर्वांना सोबत घेऊन चला, युनिटी कायम ठेवा असा मौलिक सल्लाही गुजराथी यांनी दिला.

रोटरी क्लब चोपडाचा ५० वा पदग्रहण सोहळा ऑनलाइन पद्धतीने झूम मीटिंगद्वारे मोठ्या दिमाखात पार पडला. या वेळी सर्वप्रथम रोटरी प्रार्थनेने व गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदर पदग्रहण सोहळा सोशल डिस्टेन्सचे पालन करत ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. पॉल हैरिस यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रांतपाल शाकीर शब्बीर, उपप्रांतपाल योगेश भोळे, पुनम गुजराथी यांचे ऑनलाइन पद्धतीने स्वागत करण्यात आले. यानंतर पदग्रहण सोहळा सुरू करीत मावळते रोटरी अध्यक्ष नितीन जैन यांनी नूतन अध्यक्ष नितीन अहिरराव यांच्याकडे, तर मावळते मानद सचिव धीरज अग्रवाल यांनी नूतन मानद सचिव ऍड. रुपेश पाटील यांच्याकडे पदभार सोपविला. सदर पदग्रहण सोहळ्याचे प्रास्ताविक मावळते अध्यक्ष नितीन जैन यांनी करीत, त्यांनी वर्षभरात राबवलेले उपक्रम – प्रकल्प त्यात आदर्श शिक्षक पुरस्कार, गुणवंत विद्यार्थी निवड पुरस्कार, गरजूंना कपडे वाटप, फिटनेस कैम्प, गर्भवती महिलांसाठी कॅम्प, आशा वर्करसाठी कॅम्प, मास्क व पीपीई कीट वाटप, कोविड सेंटरसाठी २१ हजाराची मदत, मानव सेवा तिर्थ वेले येथे ८०० स्क्वेअर फुटचे शेड उभारणे, शंभर बेडची व्यवस्था इत्यादी बाबींचा उल्लेख केला. तसेच यावर्षी रोटरी क्लब चोपडामध्ये नवीन सदस्य जॉईन झाले त्यांच्या परिचय करून देण्यात आला. त्यात डॉ. पराग पाटील, डॉ. अमोल पाटील, संदीप क्षीरसागर (व्यवस्थापक एस. टी. डेपो चोपडा), चंद्रशेखर साखरे, पंकज पाटील, मनोज पाटील, डॉ. सचिन कोल्हे इत्यादी सदस्यांच्या परिचय करून देण्यात आला. नूतन अध्यक्ष नितीन अहिरराव व नूतन मानद सचिव रूपेश पाटील यांचा सत्कार अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आला.

तीन ‘ई’वर भर देणार नूतन अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी आपल्या मनोगतात रोटरी अध्यक्षपद माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचे सांगून माझ्या कारकिर्दीत मी विविध उपक्रम राबविणार असा विश्वास दिला. त्यात ‘3 E’ वर भर देणार म्हणजे त्यात इझी,  इफेक्टिव आणि एन्जॉयफुल असतील असे सांगितले. तसेच गुणवंतांचा सत्कार, डॉक्टर दिवस, कृषी दिवस, करियर गाईडन्स, वॉटर एटीएम मशीन, रत्नावती नदीतील गाळ काढणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शाळांना ई-लर्निंग सेट देणे, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, अल्पदरात मेडिकल सुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्य विषयक विविध प्रोजेक्ट राबवणे, शाळा दत्तक घेऊन विविध सुविधा पुरविण्याच्या मानस अध्यक्ष अहिरराव यांनी व्यक्त केला.

अशी आहे यावर्षीची टीम

अध्यक्ष म्हणून नितीन अहिरराव मानद सचिव म्हणून ॲड रुपेश पाटील, नितीन जैन, पंकज बोरोले, अप्रित अग्रवाल, पवन गुजराथी, भालचंद्र पवार, आशिष गुजराथी, संजीव गुजराथी, विलास एस. पाटील, डॉ. नीता जयस्वाल, सुनील सचदेव, एम. डब्ल्यू. पाटील यासह विविध समित्यांतील सदस्यांचा समावेश आहे.
प्रा. अरुणभाई गुजराथी यांचा ऑनलाईन परिचय त्यांच्या स्नुषा पूनम गुजराथी यांनी मार्मिक शब्दात करून दिला. पदग्रहण सोहळ्याचे प्रमुख अतिथी प्रांतपाल शाकीर शब्बीर यांनी आपल्या मनोगतात, कोई चीज का दुख नही करना, कोविड नही होता तो मै आज अरुणभाई के बाजूमे बैठा होता. समूहमे लोग जोडते चले जाये, चोपडावालो का काम बहोत अच्छा है और अच्छा करे अशा शुभकामना त्यांनी दिल्या.

रोटरॅक्ट क्लबचेही पदग्रहण

यानंतर रोटरॅक्ट क्लबचे मावळते अध्यक्ष डॉ. ललित चौधरी यांनी आपला पदभार नूतन अध्यक्ष दिव्यांक सावंत यांच्याकडे सोपविला तसेच मावळते सचिव प्रणय टाटिया यांनी नूतन सचिव चेतन याज्ञिक यांच्याकडे पदभार सोपविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राधेश्याम पाटील यांनी केले, तर आभार मानद सचिव रूपेश पाटील यांनी मानले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.