माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली
निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं कोरोनामुळं निधन झाले. त्या सनदी अधिकारी तर होत्याच याशिवाय त्या मराठी साहित्यिकही होत्या. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून, त्यांनी काही मराठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे.
नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून ‘बाबांची शाळा’ हा मराठी चित्रपट निघाला. त्याचे संगीत दिग्दर्शनही त्यांनीच केले होते.
नीला सत्यनारायण यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९४९ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या आईचे नाव सुशीला आणि वडिलांचे नाव वासुदेव आबाजी मांडके होते, ते पोलीस खात्यात होते.
नीला सत्यनारायण यांचे शालेय शिक्षण मुंबई, पुणे, नाशिक येथे झाले. त्यांनी शालान्त परीक्षा दिल्ली बोर्डातून दिली. त्या परीक्षेत त्या १९६५ साली संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवून बोर्डात पहिल्या आल्या. नंतर त्यांनी त्यांनी इंग्रजी वाङ्मय या विषयात पदवी व पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला. १९७२ साली त्या आय.ए.एस.ची परीक्षा पास झाल्या.
नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केले. धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांनी निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले .
नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक १० आवृत्त्या ओलांडून पुढे गेले आहे. ‘सत्यकथा’ हे त्यांचे पुस्तक उद्योजकतेबाबत आहे आणि ‘एक दिवस (जी)वनातला’ हे त्या वन विभागात सचिव असताना त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित आहे.
पुस्तके
आई-बाबांची शाळा (मार्गदर्शनपर)
आयुष्य जगताना
एक दिवस (जी)वनातला (अनुभवकथन)
एक पूर्ण – अपूर्ण (आत्मचरित्रपर)
ओळखीची वाट (कवितासंग्रह)
जाळरेषा (प्रशासकीय सेवेतील अनुभव)
टाकीचे घाव
डेल्टा १५ (प्रवासवर्णन)
तिढा (कादंबरी)
तुझ्याविना (कादंबरी)
पुनर्भेट (अनुभवकथन)
मी क्रांतिज्योती (अनुभवकथन)
मैत्र (ललित लेख)
रात्र वणव्याची (कादंबरी)
सत्य-कथा (व्यवसाय मार्गदर्शन)
(संदर्भ – गुगल.कॉम)
या शब्दप्रवासाद्वारे नीला सत्यनारायण यांना साथीदार ऑनलाइन आणि बाबूजी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली।।