श्रावणी सोमवार आला की मन हमखास भूतकाळात डोकावतं. चोपड्यातील माझ्या बालपणातल्या अनेक आठवणीना प्रदक्षिणा घालून येतं. पहिली आठवण होते ती हरेश्वरची. दर श्रावणी सोमवारी तिथे भरणाऱ्या जत्रेची. आज श्रावणी सोमवार असल्याने त्या जत्रेतील स्मृतींची रिमझिम सुरु झाली आहे.
शिरपूर रोडला, गावाबाहेर साधारण २.५ कि.मी. अंतरावर महादेवाचं एक जागृत देवस्थान आहे. हेच ते प्रसिद्ध हरेश्वर मंदिर. या परिसरात संध्याकाळ नंतर अजिबात रहदारी नसायची. खुप सुनसान परिसर होता. गावाबाहेर मोकळया हवेत फिरायला किंवा मंदिरात कधी दर्शनाला ग्रामस्थ गेलेच तर अंधार पडायच्या आत घरी परत येत असत. १९८० अगोदर या परिसरा जवळ वस्ती नव्हती. साधारण ८० च्या दशका नंतर मंदिराजवळ हतनूर कॉलनी नामक वसाहत स्थापित व्हायला सुरुवात झाली आणि मग हळुहळु रहदारीला सुरुवात झाली.
श्रावणात महिनाभर, भल्या पहाटे महादेवाच्या दर्शनाला जाण्याची प्रथा होती. त्या निमित्ताने फिरणं देखील होत असे. विशेषतः गावातील समस्त महिला मंडळ पहाटे होणाऱ्या काकड आरतीला हजर राहण्यासाठी आघाडीवर होत्या. आमच्या गल्लीतील महिलामंडळ देखील यात सहभागी असायचे. मग कधीतरी मी देखील आई बरोबर काकड आरतीला जायचो. पहाटेच्या त्या शांत वातावरणात मंदिरातल्या मोठ्ठ्या पितळी घंटेचा धीरगंभीर नाद दूरपर्यंत ऐकू आला की ते वातावरण अधिक मंगलमय व्हायचं. पहाटेच्या त्या सुखद गारव्याने अंगावर शिरशिरी आली तर आईला घट्ट बिलगत तिच्या उबेत जायचो, कधी येणाऱ्या श्रावणसरींत चिंब भिजलं की आईच्या पदराला डोकं पुसत महादेवाच्या गाभाऱ्यात जायचो. एकाच वेळी दोन दैवतांच्या सानिध्यातले हे सोनेरी क्षण माझ्या मनाच्या गाभाऱ्यात कायमचे बंदिस्त झाले आहेत.
श्रावणी सोमवारची आम्ही मुले अगदी आतुरतेने वाट बघत असू. दोन कारणे होती. पहिलं कारण म्हणजे साबुदाण्याची खिचडी आणि दुसरं हरेश्वरला भरणारी जत्रा. शाळेला अर्ध्या दिवसाची सुट्टी असे. शर्यत लावून पळत घरी पोहचायचं. दप्तर ठिकाणी ठेवलं की ‘थोडीसी पेटपुजा’ व्हायची. त्या दिवशी आई वडील या दोघांपैकी कोणाचा मूड अधिक चांगला आहे आणि कोण लवकर प्रसन्न होऊ शकतं याचा अंदाज घेऊन लाडीगोडी लावायची. मग जत्रेत मजा करायला चार आणे मिळायचे. खाऊ किंवा खेळणी तेवढ्या बजेटमध्ये बसवायचं. गल्लीतील मित्रकंपनी बरोबर मस्त्या करत हरेश्वरच्या जत्रेला निघायचं.
मंदिराच्या अर्धा कि.मी. परिसरा पासून जत्रा भरायला सुरुवात झालेली असायची. ठिकठिकाणी पेढे, जिलेबी, चिवडा, गोडीशेव, शेव कुरमुऱ्यांची दुकानं, गोळ्या बिस्किटे, रेवड्या, चणे फुटाणे, खारे शेंगदाणे विक्रेते यात आमच्या शाळेच्या गेटवर रोज शेंगदाणे विकणारा “मित्रा” नावाने प्रसिद्ध असलेला विक्रेता आणि दारावर नेहमी येणारे बरेच फेरीवाले असायचे. खेळण्यांमध्ये फुगे, शिट्ट्या, पत्री टिकटिक, बासऱ्या, पिपाण्या, तुणतुणे, चष्मे, वेगवेगळे मुखवटे, खुळखुळे, भिंगऱ्या, ढोलक्या प्लास्टिकचे पोपट, ससे, हत्ती, हरणं, लाकडी बैलगाड्या, घोडे, हत्ती रथ, पांगुळगाड्या असं काही विकणारे फेरीवाले, प्लास्टिकची गृह उपयोगी वस्तू विक्रेते, स्टील, अॅल्युमिनियम, पितळी भांडी विक्रेते, लोखंडी तवे, पाट्या, उलथणे, चिमटे, खल बत्ते यांचे विक्रेते, दगडी पाटे वरवंटे, उखळ आणि जडीबुटी विकणारेही असायचे. मंदिराच्या जवळ नारळ, खडीसाखर आणि बेल फुलं, हार विकणाऱ्यांची गर्दी असायची.
मंदिरात जाऊन नंदीच्या शिंगांवर बोटांची कमान करून महादेवाच्या पिंडीचं दर्शन झालं की आत पायऱ्या उतरून खोल गाभाऱ्यात जाऊन महादेवाच्या पिंडीवर डोकं टेकवलं की खरं दर्शन झाल्याचं समाधान मिळायचं. एरवी अंधार दाटलेल्या त्या गाभाऱ्यात जत्रेच्या दिवशी मात्र अनेक पणत्या, तुपवाती, कापूर आरत्या यांचा उजेड असे. गाभाऱ्यात उदबत्ती, कापूर, बेल, फुलं आणि विजलेल्या फुलवाती यांचा संमिश्र गंध दरवळत राही. दर्शन करून झालं की जत्रेत चक्कर मारायचा. प्रत्येक दुकाना पाशी, चड्डीच्या खिशात हात घालून चार आण्याचं नाणं कुरवाळत थोडावेळ रेंगाळताना होणारा आनंद, आजच्या वातानुकुलीत मॉल मध्ये, टी शर्ट कॅज्युअल्सच्या पॉकेट मधल्या भारीतल्या वोलेट मध्ये डिजिटल कार्ड बाळगत विंडोशॉपिंग करून ब्रँडेड वस्तू चोखंदळपणे खरेदी करत फिरताना देखील होणार नाही. त्याक्षणी मनात आणि चार आण्यात जे येईल ते खरेदी करून आम्ही सारे रमतगमत त्या स्वप्नवत जत्रेतून परत येत असू.
दुसऱ्या दिवशी मंदिराजवळ नारळाच्या शेंड्यांचा आणि निर्माल्यांचा खच पडलेला असायचा. नुकत्याच झालेल्या जत्रेचा तो जिवंत पुरावा असे. माझ्या मनात देखील असाच त्या जत्रेच्या आठवणींचा खच पडलेला आहे. त्या गोळा करायला गेलो की सारी हरेश्वरची जत्राच पुन्हा एकदा नव्याने डोळ्यासमोर जिवंत होते आणि त्यात मी पुन्हा एकदा हरवून जातो !
©️संजय कंक (व्हाट्सएपवरून साभार)