मानवसेवा तीर्थने जोपासले सामाजिक भान
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) मानवसेवा तीर्थ येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्टचे ध्वजारोहण चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करणारे प्रशांत पुरुषोत्तम पाटील ( मामू ) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
तालुक्यातील वेले येथील रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस रुग्णांचा हक्काचा निवारा असावा म्हणून अमर संस्था चोपडा यांच्या माध्यमातून मानव सेवा तीर्थ ही सामाजिक कार्य करणारी शाखा सुरू आहे. येथे रस्त्यावर फिरणारे बेवारस मनोरुग्णांचा आश्रय व उपचार दिला जातो.
येथील ध्वजारोहण दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे शवविच्छेदन करणारे प्रशांत पुरुषोत्तम पाटील उर्फ मामू यांच्या हस्ते करण्यात आले. अमर संस्था संचालित मानवसेवा तीर्थ ही संस्था समाजातील दुर्लक्षित घटकासाठी अहोरात्र कार्य करीत आहे. सदर संस्था रस्त्यावर फिरणारे मनोरुग्ण, वेडसर लोकांसाठी दीपस्तंभाचे कार्य करीत आहे. आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून १०० मनोरुग्ण बरे होऊन सामान्य जीवन जगत आहेत, तर सद्य:स्थितीस ५० मनोरुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या सेवेत एन. आर. पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते कार्यरत आहेत.
दरवर्षी सदर संस्थेच्या ध्वजारोहणप्रसंगी समाजातील दुर्लक्षित घटकास आमंत्रित करून ध्वजारोहणसाठी मान दिला जातो. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून चंद्रकांत गुलाबराव पाटील हे यशस्वीपणे काम पाहत
आहेत.
समाजमनाची जाणीव ठेवत चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन करणारे प्रशांत पुरुषोत्तम पाटील (मामू) यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करणे ही कौतुकास्पद बाब आहे. त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्याना हा मान देण्यात आला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतअण्णा पाटील यांनी दिली.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव दीपक जोशी, मनोज बागूल, मानवसेवा तीर्थचे व्यवस्थापक एन. आर. पाटील, स्वप्नील धनगर, निर्मल सोनवणे, अरुण वडर, किशोर शिंदे आदी उपस्थित होते.