• Sun. Jul 6th, 2025

निकालासह सर्व परीक्षा प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या संदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची राजभवन येथे बैठक संपन्न

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची आज राजभवन येथे ऑनलाईनच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षेसंदर्भात गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनानुसार दि. 15 सप्टेंबरपासून सुरू करून दि. 31 ऑक्टोबरपर्यंत निकलासह परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच अहवाल अकॅडमीक काँसिल आणि विद्यापीठाच्या एक्साम बोर्डात ठेऊन दोन दिवसात शासनास कळवावे आणि राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक मंगळवारी लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती करावी, अशी सूचना मा राज्यपालांनी केली.

परीक्षा पद्धती संदर्भात विद्यापीठांनी व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळामध्ये परीक्षेसंदर्भात गठित केलेल्या समितीचा अहवाल सादर करून परीक्षा पद्धती निवडावी, असेही राज्यपाल महोदय यांनी सांगितले. श्री. सामंत म्हणाले, राज्यपाल महोदय यांच्या अध्यक्षेतेखाली आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून राज्यातील कोविड-१९ ची सद्यस्थितीत आणि परीक्षेसंदर्भातील नियोजन कळविण्यात येईल. असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत विद्यापीठांनी परीक्षा प्रक्रिया कशी पूर्ण करावी, पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्या संदर्भातील तयारी पूर्ण करावी. या बरोबरच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर अशा विद्यार्थांच्या परीक्षेचे सुद्धा नियोजन करण्यात यावे. या संदर्भात चर्चा करण्यात आली.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.