शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या बालशहिद दिवस..त्यानिमित्त विशेष लेख ✍️
भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेक वीरांनी प्राणाची आहुती दिलीय…मात्र अगदी लहानपणीच देशप्रेमाने भारावून गेलेला नंदूरबारचा युवक बालशहीद शिरीषकुमार मेहता व त्यांचे चार साथीदार धनसुखलाल गोवर्धनदास,शशिधर केतकर,घनश्याम गुलाबदास,लालदास बुलाखीदास यांचं नाव आपण विसरू शकत नाही.आज शहीद शिरीशकुमार मेहता व साथीदार यांच्या बलीदानाला ७८ वर्ष पूर्ण आहेत.त्यानिमित्त स्मृतीनां उजाळा देणारा हा लेख..!
म.गांधीनी ९ ऑगस्ट १९४२ ला मुंबई अधिवेशनात ‘चले जाव’चा नारा दिल्यानंतर केवळ तरुणांमध्येच नव्हे तर देशातील बालकांमध्ये देखील क्रांतीची ज्योत पेटली होती.जागोजागी निषेध मोर्चे निघत होते.कुठे सरकारी कचेऱ्यावर हल्ले करण्यात येत होते तर कुठे दूरध्वनी,तारायंत्रे उध्वस्त करण्यात येत होती.रस्ते व रेल्वेवाहतुक रोखण्यात येत होती.भारतीय स्वातंत्र्यचळवळीतल्या आजवरच्या आंदोलनात सर्वात प्रखरतेने पेटलेलं हे १९४२ चं ‘छोडो भारत आंदोलन’होतं. या आंदोलनात विद्यार्थीसुद्धा सामील होते.प्रभातफेऱ्या,वंदे मातरमच्या घोषणा या माध्यमातुन हे विद्यार्थी ब्रिटिश सरकारला ‘चले जावं’चा नारा देत होते.
९ ऑगस्ट १९४२ रोजी सकाळी सकाळी शिरीषकुमार आणि त्यांच्या बालमित्राची प्रभातफेरी निघाली. प्रत्येक विद्यार्थ्याचा हातात तिरंगी झेंडा होता. ‘वंदे मातरम’, ‘चले जाव’ म्हणत ही फेरी माणिक चौकात येऊन पोहचली.आजूबाजूच्या रस्त्यावरील लोकं कानाकोपऱ्यात उभे राहून तर कोणी घराच्या खिडक्यामधून डोकावून ही प्रभातफेरी पाहू लागली.
थोड्याच वेळात इंग्रज पोलिस अधिकाऱ्यांची गाडी येऊन शस्त्रधारी पोलिस ह्या प्रभातफेरीला आडवे आले.सर्व विद्यार्थ्यानीं झेंडे खाली ठेवा,चले जावं! ‘वंदे मातरम’च्या घोषणा बंद करा अन्यथा आपणास गोळी घालून ठार मारण्यात येईल म्हणून दरडावू लागली. या प्रभातफेरीत अवघ वय सोळा वर्ष असलेला बालक शिरीषकुमार आणि त्यांचे साथीदार सामील होते.सर्वांच्या हातात तिरंगा झेंडा होता.”नही नमशे,नही नमशे’,”निशाण भूमी भारतनू’भारत माता की जय’अशा घोषणा देत ही फेरी पुढे जाऊ लागली. पोलिसांनी मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केल्यानंतर देखील बालकांनी ते झुगारून लावले व वंदे मातरम’चा जयघोष सुरूच ठेवला.एका पोलीस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलीच्या दिशेने बंदूक रोखताच एका चुणचुणीत मुलाने उत्तर दिलं.
‘हिम्मत असेल तर माझ्यावर गोळी चालवा!’ असं म्हणत अवघ्या 16 वर्ष वयाच्या शिरीषकुमारांनी इंग्रज अधिकाऱ्याला आव्हान दिलं. गेंड्याच्या कातडीच्या या ब्रिटिश अधिकाऱ्यांनं क्षणाचाही विलंब न करता बेछूट गोळीबार केला.त्यात शहीद शिरीषकुमार व त्यांचे चार साथीदार मारले गेले.कोवळ्या वयाच्या या बालकांना देशाच्या स्वातंत्र्यसाठी जीव गमवावा लागला.या सर्व साथीदारामध्ये सर्व्यात कमी वयाचे म्हणून बालशहीद शिरीशकुमार हे होते. म्हणून त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
आज नंदूरबार शहराची देशात एक वेगळी ओळख असेल ती म्हणजे ‘बालशहिद शिरीषकुमार यांचं बलीदान!’शालेय विद्यार्थ्यांनां बालशहीद शिरीषकुमार यांचं बलीदान कळावं,विद्यार्थ्याच्या अंगात देशप्रेम निर्माण व्हावं म्हणून काही वर्षापूर्वी इयत्ता ४ थी च्या पाठ्यपुस्तकात बालशहिद शिरीशकुमारांचा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट होता.मात्र सध्याच्या अभ्यासक्रमात हा धडा दिसत नाही.नवीन पिढीला शिरीशकुमार मेहता यांनी त्यांच्या साथीदाराच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून शालेय अभ्यासक्रमात हा धडा असायला हवा.
शिरीषकुमारांच्या क्रांतिकार्याला उजाळा देण्यासाठी आम्ही काल परवा मातोश्री फाउंडेशनमार्फत निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.त्यानिमित्ताने शिरीषकुमार यांचे पुतणे श्री. नितीनभाई मेहता रा.सुरत यांच्यापर्यंत पोहचता आले.आणि जुन्या आठवणींना उजाळा देता आला.शिरीषकुमाराचे मित्र शशीधर केतकर यांचे पुतणे डॉ.अभय केतकर रा.नागपूर यांचाही संपर्क क्रमांक मिळवता आला.निबंध स्पर्धेच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांचे विचार जाणून घेण्यात आम्ही यशस्वी झालो. शिरीषकुमार मेहता आणि त्यांच्या साथीदारांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन !
लेखक : प्रवीण महाजन, युवकमित्र परिवार, पुणे
pravinpune123@gmail.com