• Sat. Jul 5th, 2025

डॉक्टरांचे उपचार आणि वाढविलेल्या मनोबलामुळे जीवनदान

जिल्ह्यातील करोनामुक्त रुग्णांनी व्यक्त केल्या भावना

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) करोनाला घाबरू नका पण जागरूक रहा. आपल्याला शासनाच्या आरोग्य विभागाकडून चांगले उपचार व सेवा नक्कीच मिळते. करोना झाल्यानंतर रुग्णालयात मिळालेले चांगले उपचार व सेवेमुळेच आम्ही आमच्या परिवारात सुखरूप परतु शकलो, अशा प्रातिनिधीक भावना कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतलेल्या काही जणांनी व्यक्त केल्या आहेत.

जळगाव शहरात राहणा-या २८ वर्षाच्या महिलेस ११ मे रोजी कोरोनाची लक्षणे जाणवताच त्यांची तपासणी केली गेली. १४ मे, रोजी त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह येताच शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना झाल्याची प्रथम भीती वाटली पण तेथे रुग्णालयातील डॉक्टर, पारिचारिका यांनी दिलेला विश्वास, दाखवलेली ममता आणि वाढविलेले मनोबल यामुळे आपण बरे होऊन घरी लवकर परत जाऊ हा आपल्याला विश्वास वाटू लागल्याचे त्या सांगतात. हा विश्वास सार्थ ठरत २१ मे रोजी पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. घरच्यांच्या चेह-यावरचा आनंद हा मला मिळालेल्या उपचाराने मिळवून दिला असे त्या सांगतात. करोना विषाणूचा संसर्ग झाला तरी आवश्यक ती खबरदारी घेतल्याने तो बरा होऊ शकतो. त्याचा उगाच बाऊ करण्याचे कारण नाही. आपल्याला शासकीय रुग्णालयात उत्तम सेवा मिळत असते यावर विश्वास ठेवा, असा सल्लाही त्या आता कोरोनाग्रस्तांना देतात.

जळगावच्या एकाच परिवारातील दोन महिलांना कोरोनाची लागण झाली. दोघींचाही १० मे रोजी तपासणी अहवाल पॉझिटीव्ह येताच येथील शासकीय कोविड रुग्णालयात दाखल केले गेले. डॉक्टरांकडून नियमित उपचार व वेळेवर औषधे मिळत होती. रुग्णालयात चांगल्या दर्जाचा चहा, नाश्ता, जेवण मिळाल्याने औषधांचा सकारात्मक परिणाम लवकर झाल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले. आमच्यावर चांगले उपचार झाल्याने आम्ही  आमच्या कुटुंबात सुखरूप परतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अमळनेरच्या ५६ वर्षांच्या पुरुषानेदेखील हीच भावना व्यक्त बोलून दाखविली. कोरोनाची लक्षणे दिसू लागताच त्यांना जळगावला दाखल केले. १० मे रोजी रिपोर्ट पाॅझिटिव्ह येताच कोविड रुग्णालयात दाखल केले गेले. मनात काहीशी भीती होती. पण, तेथे मिळणारा उपचार मला धीर देणारा ठरला. डॉक्टर आणि परिचारिकांच्या सहकार्याने चांगले उपचार झाल्याने २० मे रोजी घरी परतू शकलो. शासकीय रुग्णालयातदेखील चांगले उपचार होतात, असे ते विश्वासाने सांगतात.

पाचो-याच्या २१ वर्षाच्या युवकाचीदेखील ही अशीच प्रतिक्रिया होती. आपल्याला लक्षणे जाणवू लागताच पाचो-याच्या ग्रामीण रुग्णालयात गेलो. त्यांनी तातडीने जळगावला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतीगृहात ८ मे रोजी क्वारंटाईन केले. ९ मे रोजी पॉझिटीव्ह रिपोर्ट येताच जळगावच्या कोविड रुग्णालयात हलविले. पॉझिटीव्ह रिपोर्ट येताच भीतीचे वातावरण पसरते. रुग्ण परतणार नाही, अशी भावना सर्वसाधारणपणे जनमानसातून व्यक्त होते. मात्र, मी अजिबात डगमगलो नाही. रुग्णालयातील उपचार करणा-या सर्व स्टाफने बरे होण्याचा आत्मविश्वास दिला. त्यामुळे माझे मनोबल वाढले. रुग्णालयातील डॉक्टर करीत असलेल्या ट्रिटमेंटवर पूर्ण विश्वास ठेवला. आणि मी सुध्दा उपचारादरम्यान सकारात्मक राहिलो. त्यामुळे जीवनदान मिळून मी पूर्ण बरा होऊन दि. २१ मे रोजी घरी परतलो. आपल्याला लक्षणे जाणवताच तत्काळ रूग्णालयात जाऊन तपासणी करून घ्या. जागरूक राहून वेळेवर उपचार घेतल्याने करोनाचा संसर्ग बरा होतो असे त्याने सांगितले.

जळगावच्या वाघनगरात राहणा-या एकाच कुटुंबातील तेरा जणांना करोनाची लागण झाली. घरात एका व्यक्तीला कोरोना झाला मात्र तो लवकर लक्षात आला नाही. त्यामुळे त्यांना गमवावे लागल्याचे दु:ख त्यांच्या कुटुंबातील २३ वर्षाचा युवक व्यक्त करतो. आम्हाला लक्षणे दिसताच आम्ही रुग्णालयात दाखल झालो. वेळेवर आम्हाला चांगले उपचार मिळाले आणि आम्ही घरी परतलो. आज घरातील सगळयांची प्रकृती ठणठणीत  असल्याचे हा युवक आनंदाने सांगतो. शिवाय कोरोनाला घाबरू नका, लक्षणे जाणवताच नजीकच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्या. विनाकारण बाहेर फिरू नका. मास्क व सॅनिटायझरचा वापर करा.  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा आणि आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या, असे आवाहनही त्याने सर्व नागरिकांना केले आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.