• Sun. Jul 6th, 2025

नाशिकमधील ठक्कर डोम येथे ५०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारणार

पालकमंत्री छगन भुजबळ, महापालिका आयुक्त आणि क्रेडाई पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला निर्णय

नाशिक – (साथीदार वृत्तसेवा) नाशिक शहर व परिसरात कोविड-१९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे क्रेडाईच्या सहकार्याने ५०० बेडचे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

नाशिकमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी भुजबळ यांनी क्रेडाईच्या पदाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांची बैठक बोलावली होती. या वेळी माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. सदर बैठकीला महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, उपाध्यक्ष कुणाल पाटील, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, सदस्य अतुल शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत ठक्कर डोम येथे क्रेडाईच्या माध्यमातून ५०० खाटांचे कोविड केअर सेंटरसाठी बेडसह सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना भुजबळ यांनी केली. त्यानंतर क्रेडाईच्या वतीने सदर कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे क्रेडाई अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले.

या कोविड केअर सेंटरमध्ये महापालिकेच्या वतीने आवश्यक सर्व स्टाफ व आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात येऊन महापालिका अधिकारी यावर नियंत्रण ठेवणार असल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

क्रेडाईच्या माध्यमातून कोविडच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका रुग्णालयात पाच डिजिटल एक्सरे मशीन, पाच इसीजी मशीन, १०० ऑक्सिमिटर, ५० थर्मल स्कॅनर, हेल्थ केअर यॅप, नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रत्येकी १ हजार पीपीई किट, मास्क, नाशिक ग्रामीण पोलिसांना १००० पीपीई किट, मास्क , सॅनिटायझर, नाशिक शहर पोलिसांना ३५०० च्यवनप्राश बॉटल यासह पाच हजार गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य तसेच शासकीय निमशासकीय कार्यालयात १०० सॅनिटायझर स्टँड, १० सॅनिटायझर बूथ यासह विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आता ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटर तयार करून देण्यात येत आहे असे क्रेडाई अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.