Nepal Bus Accident: नेपाळमध्ये भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. आतापर्यंत १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. या अपघाताबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बसमध्ये प्रवास करणारे भाविक हे महाराष्ट्रातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या घटनेने खळबळ माजली आहे.
या अपघातात एकूण ४० भाविकांनी प्रवास केला होता. त्यातील १४ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या भाविकांचे मूळ गाव महाराष्ट्रातील भुसावळ आणि आसपासच्या भागात आहे. हे भाविक प्रयागराज येथून तीन बसमधून नेपाळमधील तीर्थयात्रेसाठी निघाले होते. अपघातग्रस्त बस पोखरा येथून काठमांडूला जात असताना घसरून नदीत कोसळली. मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे या अपघाताची तीव्रता वाढली. काही प्रवासी वाहून गेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारमधील मदत आणि पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की, या अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून, जखमींच्या मदतीसाठी आणि मृतदेह परत आणण्यासाठी नेपाळच्या दुतावासाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेशच्या रिलिफ कमिश्नरशीही संपर्क साधून नेपाळमध्ये झालेल्या अपघातातील भाविकांची मदत करण्यात येत आहे.
नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बसचा क्रमांक UP FT 7623 आहे. ही बस गोरखपूर जिल्ह्यातील धरमशाला मार्केटमधील सौरभ केसरवानी यांच्या पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. बस पोखरा येथून काठमांडूला जात असताना सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास नदीत कोसळली. स्थानिकांनी हा अपघात पाहून पोलिसांना माहिती दिली.