आज परिस्थितीचा घेणार आढावा; खा. रक्षाताई खडसे यांची माहिती
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजाराहून अधिक झालेली आहे. तसेच १० जून रोजी वयोवृद्ध महिला कोविड रुग्णालयाच्या शौचालयात मृतावस्थेत सापडल्यामुळे जिल्हयात एक संतप्त भावना पसरली होती.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खासदार रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. यांना ११ जून रोजी पत्र पाठवून जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात अवगत करून जळगाव जिल्हयात केंद्र सरकारची निरीक्षण पथक पाठवून जळगाव जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी अधिकारी जळगाव जिल्ह्यात पाठवावे अशी विनंती केलेली होती, यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाच्या सचिव श्रीमती प्रीती सुदान यांच्याकडून खासदार रक्षाताई खडसे दररोज आढावा घेत होत्या.
सदर पत्राची दखल घेऊन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी दोन अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे.
केंद्रीय आरोग्य समितीचे सदस्य डॉ. अरविंद अलोने वरिष्ठ प्रादेशिक संचालक आरोग्य व कुटुंब कल्याण पुणे आणि डॉ. एस. डी. खापर्डे सल्लागार सार्वजनिक आरोग्य हे १९ जून रोजी जळगाव पोहोचले असून, आज दि २० जून रोजी खासदार रक्षाताई खडसे त्यांची भेट घेणार आहेत.
सदर केंद्रीय पथक जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाबत सुरु असलेल्या कारवाईची माहिती घेणार आहेत.
जिल्ह्यातील व महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या एकूण केसेस, केसेसचा कालावधी, भौगोलिक विस्तारात असलेले रुग्ण, कोरोना रुग्णांमध्ये असलेले विविध आजार, कोरोना रुग्णांचे वर्गीकरण जसे अलगीकरण, बाधीत क्षेत्र, बफर झोन, अलगीकरण कक्षाबाहेरील रुग्ण, संपर्कातून व संपर्क यादीत नसलेले कोरोना रुग्ण आदी माहिती घेणार आहेत.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचीही संपूर्ण संकलित केलेली माहिती, कंन्टेनमेंट झोनबाबतचा तपशील मागवण्यात आला आहे तसेच त्याची लोकसंख्या, तेथील पॉझिटिव्ह केसेस, घर टू घर झालेला सर्वे, प्रवासाची माहिती, एकूण परजिल्ह्यातून आलेले लोक आदी विषयावर चर्चा होणार आहे.
या पथकाकडून जिल्ह्यातील कोवीड सेंटर्सची माहिती घेतली जाणार आहे. तसेच खासगी रुग्णालयातील व्यवस्था, शासनाकडून कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजना, यासाठी करण्यात आलेली खरेदी याचीही माहिती घेतली जाणार आहे.
या सर्व माहितीचे संकलन करून जळगाव जिल्ह्यातील कोरोनाला आळा घालण्यासाठी उपाययोजना राबवल्या जातील. सदर पथक राज्याचे मुख्य सचिव, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव आणि जळगाव जिल्हाधिकारी यांच्या समन्वय साधून त्यांचे कार्य करेल अशी माहिती खासदार रक्षाताई खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.