श्री संत सावतामाळी युवक संघाच्या वतीने आयोजन
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चोपडा तालुका व शहर कार्यकारणी यांच्यावतीने 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 10 वी व 12 वी परीक्षेत 75% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
सदर संघटनेने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची परंपरा कोविड 19 चा प्रादुर्भाव असतानासुद्धा कायम ठेवली. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी संघटनेच्या शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा घरी जाऊन सन्मानपत्र व मेडल देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
चोपडा तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत संपूर्ण तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविणारी कु. रोहिणी माळी व तिच्या पालकांनी संघटनेतर्फे माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्याचे कौतुक केले. यामुळे माळी समाजातील विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा मिळणार असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पावसाची रिपरिप सुरू असतानादेखील करोना संदर्भातील शासकीय नियमांचे पालन करून तालुक्यातील जवळपास 70 विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन सत्कार करण्यात आला.
युवक संघाच्या वतीने दरवर्षीच अशाच पद्धतीचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. सदर विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण महाजन, विभाग संपर्कप्रमुख समाधान माळी, जिल्हा उपाध्यक्ष अल्केश महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र महाजन उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संघाचे चोपडा तालुकाध्यक्ष समाधान महाजन, सचिव दीपक महाजन, कार्याध्यक्ष अरुण महाजन, शहराध्यक्ष रोहित माळी, उपाध्यक्ष विठ्ठल माळी, कार्याध्यक्ष नरेंद्र महाजन, सोशल मीडिया प्रमुख राहुल माळी, हर्षल महाजन, महेंद्र भामरे, स्वप्निल माळी, राहुल माळी, शुभम माळी, योगेश माळी आदींनी मेहनत घेतली.