• Sat. Jul 5th, 2025

टोकरे कोळी जमातीचे प्रमाणपत्र अवैध : जात पडताळणी समितीचा निकाल

जळगाव (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील चोपडा येथिल शिवसेनेच्या आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसुचित जमातीचा दावा असणारे प्रमाणपत्र नंदुरबार येथिल अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने अवैध ठरविले आहे. त्रिसदस्यीय समितीने याबाबत दि. ४ नोव्हेंबर रोजी याबाबत आदेश काढले असल्याची माहिती तक्रारदार माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी दिले. यामुळे आता लताबाई सोनवणे यांचे आमदारपद धोक्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

चोपडा विधानसभेतून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अनूसुचित जमाती प्रवर्गातून लताबाई चंद्रकांत सोनवणे या शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी त्यांच्या अनुसूचित जमातीचा दावा करणाऱ्या प्रमाणपत्राबद्दल उपसंचालक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून समितीसमोर याबाबत सुनावणी झाली. दरम्यान निकालास विलंब होत असल्याने तक्रारदार वळवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने समितीला लवकरात लवकर निकाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपासणी समितीने बुधवारी (दि.४) याबाबत निकाल देवून लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचे अनूसुचित प्रमाणपत्र अवैध ठरवून ते रद्द करण्यात येत असल्याचा निकाल दिला आहे.

असा आहे प्रकरणाचा निकाल

लताबाई चंद्रकांत कोळी कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे तसेच आप्तभाव संबध परिक्षेच्या आधारे त्यांचा टोकरे कोळी अनूसुचित जमातीचा दावा सिध्द करु शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा हा दावा अवैध ठरविण्यात येत आहे. त्यांनी सादर केलेले उपविभागीय अधिकारी , जळगाव यांनी दिलेले टोकरे कोळी अनूसुचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहे. आदेश झाल्यापासून त्यांनी आठ दिवसाच्या आता मूळ जमातीचे प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. त्यांनी संबधित राखीव प्रवर्गातून निवडणुक लढविली असल्याने तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडणुक लढवीी असल्यामुळे तसेच संबधितप्रमाणपत्राच्या आधारे देय नसलेला लाभ मिळवल्याने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यासाठी जळगाव महापालिका आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या दिनेश तिडके, शुभांगी सपकाळ व सिताराम भालेकर या त्रिसदस्यीय समितीने हा निकाल दीला आहे.

खऱ्या आदिवासींना न्याय मिळाला- वळव

दरम्यान तक्रारदार जगदीशचंद्र वळवी यांनी या निकालामुळे खऱ्या आदिवासींना न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. दिड वर्षापूर्वी याबाबत तक्रार केली होती. निकालास विलंब लागत असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर न्यायालयाने समितीला आदेश दिल्याने ४ नोव्हेंबर रोजी निकाल देण्यात आल्याची माहीतीही वळवी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

निकालास उच्च न्यायालयात आव्हान देणार

याबाबत प्रतिक्रीया घेण्यासाठी आ. लताबाई सोनवणे यांना संपर्क केला असता, होवू शकला नाही. दरम्यान त्यांचे स्वीय सहाय्यक गणेश भोईटे यांनी या निकालाविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहीती यांनी दिली असून सदर निकालाने तालुक्यातील जनतेत मात्र खळबळ उडाली आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.