चोपडा रोटरी क्लबतर्फे यशस्वीरीत्या आयोजन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) रोटरी एक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था असून, सतत समाजात विविध क्षेत्रांमध्ये आपले सेवाभावी योगदान देत आला आहे. त्यात रोटरी क्लब चोपडाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत असताना कोरोना काळातसुद्धा सेवा देण्याचे कार्य अविरत सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून या शिबिराअंतर्गत चोपडा बस स्थानकात असलेले सुमारे दीडशे बस चालकांचे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली, सदर शिबिर हे श्री गणेशा नेत्रालय,पाठक गल्ली, चोपडा येथे नुकतेच पार पडले.
सदर शिबिराचे उद्घाटन चोपड्यातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. दीपक ओ. पाटील (साई) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यासोबत रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख डॉ. सचिन कोल्हे व संदेश क्षीरसागर उपस्थित होते.
कोरोना काळानंतर एसटी बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यात एस टी बस चालकाची भूमिका ही महत्वाची व जबाबदारीची असल्या कारणाने रोटरी क्लब चोपडाने बस चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचे ठरवले, असे अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी सांगितले.
सदर शिबिर नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन कोल्हे यांचा मार्गदर्शनात पार पडले. तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावयाची याबाबतचे मार्गदर्शनही करण्यात आले.
सध्याच्या धावपळीच्या युगात मधुमेह हा सर्वसामान्य आजाराप्रमाणे पसरत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास याचे परिणाम शरीरावर होतात. मात्र, याचा मोठा फटका बसतो तो डोळ्यांना. डोळ्यांच्या आतील नेत्र-पटलावर म्हणजे रेटीनावरदेखील मधुमेहाचे दुष्परिणाम होऊन पूर्णपणे अंधत्त्व येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी वेळीच निदान होऊन त्यावर उपचार होणे गरजेचे असते, असे डॉ. दीपक पाटील यांनी सांगितले. याचबरोबर त्यांनी शिबिरादरम्यान भेट देऊन शिबिराची पाहणी केली.
शिबिर यशस्वी होण्यासाठी रोटरीचे पंकज बोरोले, प्रवीण मिस्त्री, चंद्रशेखर साखरे, प्रफुल्ल गुजराथी, एम डब्ल्यू पाटील, अनिल अग्रवाल व श्री गणेशा नेत्रालयाचे सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. तर रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर योगेश भोळे यांचे मार्गदर्शन लाभले.