नगरपरिषद विकासकाम कार्यक्रम पत्रिकेत माजी आमदारांचे नाव गायब
पडद्यामागील राजकारण
गेल्या अनेक दिवसांपासून चोपडा तालुक्याच्या राजकारणात काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष बदल केल्याने राजकीय ढवळाढवळ सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यानंतर आता चोपडा नगरपरिषदेकडून शहरात अनेक विकासकामांचा धडाका सुरू झाला आहे. निवडणुका जवळ आल्या की विकासकामांची यादीच लोकप्रतिनिधी जनतेसमोर सादर करीत असतात, त्यामुळे चोपडे नगरपरिषदही आज चोपडा शहरातील तीन जलकुंभांचा सोहळा पार पडला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये तापी, गुळ आणि अनेर या जलकुंभांचा समावेश असून, यासाठी सर्वसाधारणपणे 64 कोटी रुपयांची रक्कम अंदाजपत्रकात नमूद केली आहे.
या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे उद्घाटक म्हणून लाभले तसेच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी होते. या उद्घाटन सोहळ्याची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांच्या नावाचा आयोजकांना विसर पडला असल्याचे दिसत आहे. सन 2009 ते 2014 या कालावधीत चोपडा मतदारसंघाचे आमदार असणारे राष्ट्रवादीचे नेते जगदीशचंद्र वळवी यांचे नाव या पत्रिकेतून वगळण्यात आले आहे. एकंदरीत हे नाव जाणीवपूर्वक टाळण्यात आले आहे का? याबद्दलही शहरासह तालुक्यात अनेक चर्चांना आता उधाण आलेले आहे. एकीकडे राज्यात महा विकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असताना या तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्या अधिपत्याखाली चोपडा नगरपरिषद वाटचाल करीत आहे. मात्र, माजी आमदाराचे नाव एका मुख्य उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेतून कसे वगळण्यात आले याबद्दल आता अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार जगदीशचंद्र वळवी हे विजनवासात असल्याचे चित्र भासवले असून, त्यातच आता या उद्घाटन सोहळ्याच्या पत्रिकेतही त्यांचे नाव उल्लेख नसल्याने किंवा टाळण्यात आल्याने ते वेगळी चूल मांडण्याची तयारी तर करीत नाहीना असेही प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
चोपडा विधानसभा मतदार संघाचे राजकारण हे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांच्या अवतीभवती नेहमीच राहिले आहे. गेल्या सहा महिन्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी भाजप केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. यासह शिवसेनेचे माजी आमदार कैलासबापू पाटील, माजी जिप सदस्या इंदिराताई पाटील यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने जुने आणि नवे असा वाद आता काही प्रमाणात का असेना पण दिसून येत आहे. त्याची एक झलक काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा बँक चेअरमनपदाच्या निवडणुकीत दिसून आली होती.
विशेष म्हणजे, या उद्घाटन सोहळ्याच्या पत्रिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेससह नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती असलेले गजेंद्र जयस्वाल यांचेही नाव फोटोसह घेण्यात आले आहे. मग पत्रिकेतील प्रोटोकॉलनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार असलेले जगदीशचंद्र वळवी यांचे नाव का वगळण्यात आले? आता जगदीशचंद्र वळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही सुप्त संघर्ष सुरू आहे अशीही चर्चा आता केली जात आहे. तिकडे चोपडा नगरपरिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जीवनभाऊ चौधरी यांनीही आगामी निवडणुकीत वेगळी चूल मांडण्यासाठी चाचपणी सुरू केल्याचेही जाणकारांमध्ये बोलले जात आहे. चोपडे नगरपरिषदेत शहर विकास आघाडी या पॅनलच्या अंतर्गत कामकाज सुरू असताना अशाप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचा एका मोठ्या उद्घाटन सोहळा पत्रिकेत नामोल्लेख टाळणे याकडे राजकीय जाणकारांनी लक्ष वेधले आहे.
या उद्घाटन सोहळ्याच्या पत्रिकेत जळगाव जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार यांचा आवर्जून उल्लेख करण्यात आला असून, नेमका चोपडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार यांचा नामोल्लेख का करण्यात आला आहे असा प्रश्नही जगदीशचंद्र वळवी यांचे समर्थक आता विचारू लागले आहेत. तिकडे विकासाची गुढी उभारत असताना अशाप्रकारे नावाचा उल्लेख टाळणे हे चोपडा तालुक्याच्या राजकारणाला शोभणारे नसल्याचेही बोलले जात आहे. येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नाम उल्लेख टाळण्याचा काय परिणाम होतो हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाविकास आघाडी राज्यात अस्तित्वात येण्याअगोदर चोपडे नगरपरिषदेत अस्तित्वात होती त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या इच्छुक उमेदवारांमध्ये काही प्रमाणात सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे त्याचीच ही ठिणगी म्हणावी लागेल. याच कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय कांग्रेस तर्फे गत विधानसभा निवडणुकीतील उमेदवार ज्ञानेश्वर भादले यांनी देखील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधून आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी रहाणार असल्याचे संकेत दिले आहेत. याचा विचार केला, तर माजी आमदार जगदीश वळवी यांना टाळणे किंवा वगळणे क्रमप्राप्त झाले असावे, असेही जनमानसात चर्चिले जात आहे.
– अनिलकुमार द्वा. पालिवाल
ज्येष्ठ पत्रकार, चोपडा
भ्रमणध्वनी – ९४२३५६३८९२