चोपडा ( साथीदार प्रतिनिधी) येथील बस आगारातून कोविड काळात बंद केलेल्या गुजराथ व मध्यप्रदेशातील आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरु करण्यासाठी तालुका प्रवासी संघाचे वतीने आज बस आगार व्यवस्थापक यांना मागणी निवेदन सादर करण्यात आले. संघाचे वतीने तालुका सरचिटणीस व ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल यांनी महाव्यवस्थापक मुंबई, यांच्या नावाने सादर केलेल्या या निवेदनात चोपडा आगारातून अहमदाबाद, राजकोट, बडोदा येथे कायमस्वरूपी रातराणी बससेवा चालू करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच मध्यप्रदेशातील इंदौर, बर्हाणपूर,बलवाडी व वरला या बससेवा देखील पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. आगार डिटीएस श्री. ए.टी.पवार यांनी निवेदन स्विकारले व वरिष्ठांना पुढील कार्यवाही साठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.