• Sat. Jul 5th, 2025

करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वय आवश्यक

नवीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची प्रतिक्रिया

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून घरोघरी जावून संशयितांची शोध मोहिम राबविण्यात येत आहे. संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये आवश्यक ते उपचार सुरू आहेत. कोविड सेंटरमध्ये दाखल झालेला प्रत्येक रुग्ण लवकरात लवकर पूर्णपणे बरा होऊन त्याच्या कुटुंबियांमध्ये आपल्याला आनंद निर्माण करता यावा. यास सर्व कोविड सेंटरच्या डॉक्टरांचे प्राधान्य असणे  आवश्यक आहे. त्यासाठी कोविड  सेंटरच्या सर्व डॉक्टरांनी दररोज सायंकाळी नियमितपणे व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमांतून एकमेकांशी संवाद साधावा. तसेच कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांबाबत काय खबरदारी घेणे आवश्यक आहे. याची माहिती घेऊन पुढील उपचारासंबंधी योग्य ती पाऊले उचलावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय समन्वय समिती व नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी त्यांनी  आरोग्य विभागाच्या यंत्रणांसह सर्व संबंधितांना वरील सूचना केल्या.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जात प्रमाणपत्र  पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रार्दुभावासह मृत्यूदर रोखण्यासाठी स्वॅब तपासणी अहवाल २४ तासांत प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन करावे.

बैठकीस उपस्थित जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी मनुष्यबळ, साधनसामुग्रीबाबत उपस्थित केलेल्या अडचणींवर लवकरच योग्य तो मार्ग काढण्यात येईल. असे सांगून  सकारात्मक आणि सांघिक प्रयत्नांतून कोरोना विषाणूला आपण जिल्ह्यातून हद्दपार करू, असा विश्वास या वेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यक्त केला. कोरोना कक्षात २४ तास आरोग्य सेवा अविरतपणे कार्यरत असणे आवश्यक असून सर्व रुग्णांना आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळणे हा त्या रुग्णांचा मुलभूत अधिकार आहे. त्यापासून एकही रुग्ण वंचित राहता कामा नये, तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्यक्ष कोरोना कक्षात जावून आपल्या आप्तजनांची भेट घेणे टाळावे. तसेच आरोग्य प्रशासनाने नातेवाइकांना त्यांच्या कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधण्यासाठी  दिवसातून किमान दोन वेळा निश्चित करून व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचा संवाद घडवून  आणावा. त्यात कुठेही उणिवा भासता कामा नये तसेच समन्वयाची कमीसुध्दा आढळता कामा नये, असेही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेवटी सर्व यंत्रणांना उद्देशून सांगितले.

प्रारंभी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाने आतापर्यंत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजना आणि केलेल्या कामाचा लेखाजोखा जिल्हाधिका-यांसमोर सादर केला.

यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी कोविड रुग्णालयास भेट दिली. तेथील कामकाजाची तसेच रुग्णांवर करण्यात येत असलेले उपचार व औषधी आवश्यक त्या सोई-सुविधांची पाहणी केली. तसेच अधिष्ठाता, डाॅक्टर यांचेशी चर्चा करून आवश्यक त्या सूचनाही केल्या. या वेळी प्रशासक डाॅ. पाटील, अधिष्ठाता डाॅ. रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. चव्हाण, नोडल अधिकारी लोखंडे यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.