• Sat. Jul 5th, 2025

ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनामुळे एक ध्येयवादी पत्रकार काळाच्या पडद्याआड- छगन भुजबळ

नाशिक – (साथीदार वृत्तसेवा) दैनिक पुण्य नगरी समुहाचे संस्थापक संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे याचं निधन झाल्याचं वृत्त समजल. अत्यंत दु:ख झालं. मराठी पत्रकारितेतील व्रतस्थ कर्मयोगी मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनाने आज एक ध्येयवादी पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याच्या शोक भावना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

शोक संदेशात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, मुळचे जुन्नर तालुक्यातील असलेले मुरलीधर शिंगोटे यांनी केवळ इयत्ता चौथीपर्यंत घेतलेलं शिक्षण अर्धवट सोडून नोकरी व्यवसायासाठी मुंबईची वाट धरली. सुरुवातीला पडेल ती कामे करुन उदरनिर्वाह केले आणि त्यातूनच बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र वितरणाची कामे सुरु केली. त्यानंतर हळूहळू स्वत:ची वृत्तपत्र एजन्सी सुरु करत आणि अल्पावधीतच मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी या वृत्तपत्रांच्या वितरणात मोठ यश मिळवलं. त्या काळात आख्ख्या मुंबईची वितरण व्यवस्था जुन्नरच्या दोन तरुणांनी ताब्यात घेतली होती. दक्षिण भारतातील इनाडू, गुजरातमधील गुजरात समाचार, संदेश यांसह डझनभर वृत्तपत्रांची वितरणाची एजन्सी ताब्यात घेत ८० ते ९० च्या दशकात महाराष्ट्रातील वितरण क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलेलं व्यक्तीमत्व म्हणून स्व.शिंगोटे यांच्याकडे पाहिलं गेलं.

स्व.मुरलीधर शिंगोटे यांनी माझ्या माझगाव मतदारसंघातील छोट्याश्या प्रेसमधून मुंबई चौफेर तसेच पुण्यनगरी या वर्तमानपत्रांची सुरुवात केली. त्यांच्याकडे वृत्तपत्र क्षेत्रातील अनुभवाची शिदोरी असल्याने वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. यासाठी प्रसंगी त्यांनी स्वतः वर्तमान पत्राचे गठ्ठे वाहून नेत त्याचे वितरण देखील केले. अपार कष्टाच्या जोरावर पत्रकारिता क्षेत्रात काम सुरु केल्यानंतर त्यांनी परत मागे वळून बहितले नाही. त्यांनी पुढे दैनिक वार्ताहर, दैनिक यशोभूमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता यासारखी दैनिक सुरु करत पुण्य नगरी समूहाच साम्राज्य निर्माण केलं. पत्रकारिता क्षेत्रात समर्पित भावनेतून काम करत असतांना मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात अभूतपूर्व असं काम उभं केलं. त्यांच्या निधनाने आज एक समर्पित व्यक्तीमत्व कायमच हरपलं आहे. मी व माझे कुटुंबीय शिंगोटे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो असे त्यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.