जळगाव जिल्हा मनियार बिरादरी सदस्यांनी घेतली आयएमए अध्यक्षांची भेट
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) आयएमएमार्फत उपलब्ध करून दिलेले २५० डॉक्टरांनी इमाने इतबारे आपला सेवाधर्म निभावल्यास जळगावकर आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहतील, अशी विनंती जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख व त्यांचे सहकारी यांनी आयएमए अध्यक्ष डॉ. दीपक पाटील यांना प्रत्यक्ष भेटून एका निवेदनाद्वारे केली आहे.
अध्यक्ष डॉ. पाटील यांची वर्तमानपत्रात मुलाखत आली व त्यात त्यांनी आमच्या आयएमआयतर्फे २५० डॉक्टरांची कोविड रुग्णालयात सेवा लावण्यात आली आहे, हे वाचून आनंद झाला व आयएमएचे अभिनंदन करण्यासाठी फारुक शेख व त्यांचे सहकारी थेट डॉ. दीपक पाटील यांच्या रुग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पाच मागण्याचे निवेदन दिले.
निवेदनातील मागण्या :
१) सामान्य रुग्णालयातील कोव्हिड कक्षात आपले तज्ञ डॉक्टर यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष रुग्णांना भेटून त्यांच्या केस पेपर वर तज्ञ डॉक्टरांनी सूचना केल्या प्रमाणे ही औषधे नर्सिंग स्टाफ यांनी दिली किंवा नाही हे रुग्णा समक्ष तपासावे.
२) डॉक्टरांनी नमूद केलेले औषधी अथवा इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध नसल्यास व त्या इंजेक्शन मुळे रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होत असल्यास सदरचे औषध व इंजेक्शन रुग्ण ची आर्थिक परिस्थिती नसल्यास सदर चा खर्च बिरादरी करेल फक्त आपण त्या रुग्णाच्या नातेवाईकांना सदरचे औषधे बाहेरून आणा हे स्पष्ट सांगायला हवे.
३) जळगाव शहरातील नव्हे तर सम्पूर्ण जिल्ह्यातील आपल्या सर्व डॉक्टरांना आपली खासBगी दवाखाने उघडण्यास सांगावी.
४) जे तज्ञ डॉक्टर आहे त्यात एमडी फिजिशियन, नाक, कान, घसा, डायबेटिक, हृदयरोग व इतर तज्ञ यांनीसुद्धा आपली दवाखाने त्वरित सुरू करावी.
५) जळगाव जिल्ह्यातील बीएएमएस , बीयूएमएस, डीएचएमएस व जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टरांना सुद्धा आयएमएने विनंती करून दवाखाने सुरू करण्याचे सांगावे.
यावर डॉ. दीपक पाटील यांनी आपल्या मागण्या योग्य असून त्यावर त्वरित कारवाई करण्यासाठी मी व्यक्तिशः शंभर टक्के प्रयत्न करेल, असे आश्वासन दिलेले आहे
निवेदन देण्यात आले तेव्हा जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, कुल जमातीचे सचिव डॉ. जावेद शेख, ईदगाह ट्रस्टचे सहसचिव अनीस शाह, छबील सोसायटीचे हारून महबूब व जामा मस्जिद ट्रस्टचे तय्यब शेख हे शिष्टमंडळात होते.
या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाउन गोरक्ष गाडिलकर यांची भेट घेऊन सामान्य रुग्णालयसंबंधी चर्चा केली.