• Fri. Jul 4th, 2025

ज्येष्ठ निवेदिका मंगलाताई खाडिलकर यांचे गौरवोद्गार

चोपडा (प्रतिनिधी) आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी झटणारी स्त्री सतत व्यस्त असते; तिच्या मनात एक असंतोषाचे बीज असते. स्त्रीच्या मनात कोंडलेली ही वाफ मोकळी करणे म्हणजेच तिचा योग्य तो सन्मान करणे होय. स्त्री वेगवेगळ्या नात्यात आपल्या कर्तृत्वाचे आणि जीवनाचे सौंदर्य प्रदर्शित करत असते. आपल्याला प्रत्यक्ष जेवढे दिसते त्यापेक्षा स्त्रीचे जग खूप मोठे असते. अनेक दृश्य-अदृश्य नात्यांचे धागे स्त्रीच्या हातात असतात व त्यात ती कायम गुंतलेली असते. समाज तिला कधीही उत्तम अशी पदवी देत नाही पण तिने उत्तम काम करावे ही अपेक्षा मात्र नेहमीच करतो. तिने आपल्या कामातून विश्वासार्हता निर्माण केली की जग तिचा नक्कीच सन्मान करते, असे गौरवोद्गार काढत मुंबई येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ निवेदिका सौ. मंगला खाडिलकर यांनी पुरस्कार प्राप्त महिलांचे कौतुक केले.

चोपडा येथील नगरपरिषद नाट्यगृहात चोपडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विश्वस्वामिनी पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी हे अध्यक्ष म्हणून, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कैलास पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील हे मंचावर उपस्थित होते. यावेळी पुरस्कार प्राप्त महिलांतर्फे सौ. रेखा पाटील व डॉ. स्वप्ना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तर डॉ. केतकी पाटील यांनी मनोगतातून पुरस्कार प्राप्त महिलांचे अभिनंदन करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

विश्वस्वामिनी पुरस्कार वितरण सोहळ्यात २५ महिलांचा सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन सौ. मंगला खाडीलकर व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.



याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. अरुणभाई गुजराथी म्हणाले की, स्त्री म्हणजे सृजनशक्ती, स्फुरणशक्ती, स्मरणशक्ती आणि सहनशक्ती. संस्कार आणि संस्कृतीची निर्मिती स्त्रीच्याच ठिकाणी होत असते. आपल्या समाजात माणूस संस्कृती वाढली पाहिजे. विश्वस्वामिनी पुरस्कार म्हणजे गुण, सेवा, कार्य आणि मानवतेचा गौरव असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

विश्वस्वामिनी पुरस्कार २०२५ – पुरस्कार प्राप्त महिला :
श्रीमती चंद्रकला दत्तात्रय पाटील (सरपंच, चहाडी), सौ. नम्रता सचिन पाटील (पुणे), सौ. स्वामिनी नीलेश पाटील (ग्रामविकास अधिकारी, अमळनेर), सौ. स्वाती योगेश नन्नवरे (शाखा अभियंता, जळगाव), डॉ. सौ. क्रांती संदेश क्षीरसागर (क्रीडा संचालिका, चोपडा कॉलेज), अंजुम रमजान तडवी (सरपंच, मोहरद), डॉ. सौ. नंदिनी पांडुरंग वाघ (प्राध्यापिका, पंकज कॉलेज, चोपडा), सौ. अर्चना राजेंद्र पाटील (अध्यक्ष रुद्र अपंग संघटन), सौ. सोनाली नारायण पाटील (माजी सभापती, पं. स. चोपडा), श्रीमती इंदिराताई कृष्णराव पाटील (सामाजिक कार्यकर्त्या, वरडी), सौ. रेखा सर्जेराव पाटील (निवृत्त मुख्याध्यापिका,चोपडा), सौ. कविता हेमंत वाणी (संचालिका, रघुवंश ऍग्रो फार्म), सौ. लीना राहुल पाटील (चोपडा), डॉ. सौ. नीता विनीत हरताळकर (सोनोग्राफी तज्ज्ञ, चोपडा), सौ. आशाबाई रवींद्र पवार (अध्यक्ष, भाजप महिला मोर्चा चोपडा), श्रीमती दीपाली रामचंद्र साळुंखे (स्वच्छता निरीक्षक, चोपडा), सौ. कल्पना रमाकांत बोरसे (संचालिका, प्राजक्ता सर्जिकल कॉटन), सौ. मनीषा योगेश सोनवणे (संचालिका, नवजीवन सोलर), सौ. रत्ना पवन पाटील (सरपंच, मोहिदे), सौ. संध्या नरेश महाजन (माजी नगरसेविका, चोपडा), डॉ. स्वप्ना संदीप पाटील (नाक, कान, घसा तज्ज्ञ, चोपडा), जयबून बबन तडवी (सेवानिवृत्त पर्यवेक्षिका, पारोळा), सौ. नेहा चौधरी (इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, जळगाव) आणि मरणोत्तर  स्व. सौ. सविता संजीव शिरसाठ (माजी सरपंच, अनुवर्दे)

कुमुदिनी गुजराथी यांना जीवनगौरव पुरस्कार
येथील चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी व चोपडा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी यांच्या मातोश्री व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कुमुदिनी नटवरलाल गुजराथी यांना मान्यवरांच्या हस्ते ‘विश्वस्वामिनी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या आरंभी मनोज चित्रकथी व विजय पालीवाल यांनी ईशस्त्वन सादर केले. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी चोपडा तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नंदलाल मराठे, सचिव विलास पाटील, तुषार सूर्यवंशी, तौसिफ खाटीक, विश्वास वाडे, हेमकांत गायकवाड, विनायक पाटील, डॉ. सतीश भदाणे, आकाश जैन, महेश पाटील यांनी परिश्रम घेतले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.