ऍसिडिटीचा त्रास जर थोडा असेल घरगुती औषधे घेऊन हा त्रास थांबू शकतो. थोडीशी ऍसिडिटी असेल तर घरगुती उपायाने बरे वाटू शकते.
१. तुळशीची पाने
तुळशीच्या पानांमध्ये सुदींग आणि कार्मीनेटीव्ह म्हणजेच पोटाला आराम वाटावे असे गुणधर्म असतात. त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास थोड्याच वेळात कमी होतो. तुम्हाला थोडीही जळजळ जाणवत असेल तर लगेच तुळशीची पाने चावून चावून खा किंवा ३-४ पाने कपभर पाण्यात उकळून त्याचा काढा करून प्या.
तुळस शरीरासाठी अत्यंत उपकारक आहे. नियमित सेवन केल्यास ह्याने इतर शारीरिक त्रास सुद्धा कमी होतात.
२. बडीशेप जेवणानंतर बडीशेप खाणे ही सवय अत्यंत चांगली आहे. ह्याने अन्नपचन चांगले होण्यास मदत होते. ऍसिडिटीचा त्रास सुद्धा कमी होतो. बडीशेपेचा काढा किंवा फेनेल टी प्यायल्यास आपली पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. अपचन आणि पोट फुगत असेल तर बडीशेप हा त्यावरचा सोपा व प्रभावी उपाय.
३. दालचिनी
दालचिनी हे नैसर्गिक अँटासिड आहे. ह्याने बिघडलेले पोट जागेवर येते. अन्नपचन सुधारते आणि शरीरात पोषणमूल्ये शोषण्याचे कार्य सुरळीत होते. गॅस्ट्रोइंटेस्टीनल ट्रॅकमध्ये इन्फेक्शन असेल किंवा ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर दालचिनीचा काढा उपयुक्त आहे. दालचिनीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत.
४. ताजे ताक
ताजे ताक म्हणजे पृथ्वीवरील अमृत आहे. छातीत जळजळत असेल तर ताजे गोड ताक नुसतेच किंवा सैंधव मीठ, किंवा कोथिंबीर बारीक चिरून त्यात घालून प्यायल्यास ताबडतोब आराम मिळतो. मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाल्ल्याने जर ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर ताक हा त्यावरचा रामबाण उपाय आहे. ताक पोटातील ऍसिडिटी न्यूट्रलाइज करते.
५. गूळ
गुळामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. त्यामुळे आतड्यांची शक्ती वाढते. तसेच जेवण संपवताना एक गुळाचा खडा खाल्यास अन्नपचन चांगले होते. गुळामुळे आपला डायजेस्टिव्ह ट्रॅक अल्कलाईन राहतो व ऍसिडिटी कमी होऊन समतोल साधला जातो. उन्हाळ्यात तर गुळाचे सरबत प्यायल्याने शरीराचे तापमान नियमित राखण्यास मदत होते.
६. लवंग
आयुर्वेद व पारंपारिक चायजीन औषधांमध्ये लवंगीला महत्वाचे स्थान आहे. पोटाच्या विकारांसाठी लवंग गुणकारी आहे. लवंगीत कार्मीनेटीव्ह गुणधर्म म्हणजेच वात तयार न होण्याचे गुणधर्म असल्याने लवंग खाल्ल्यास गॅसेसचा त्रास होत नाही. वातूळ पदार्थ खाताना किंवा तयार करतानाच त्यात लवंग घातली तर गॅसेस होत नाहीत.
लवंग व वेलची जेवणानंतर खाल्ल्यास ऍसिडिटीचा त्रास सुद्धा कमी होतो तसेच तोंडाला वास येत असल्यास त्यावर सुद्धा गुणकारी आहे.
–
–
७. जिरे
पोट दुखले की ओवा व जिऱ्याचा काढा देणाऱ्या आपल्या आज्या जिऱ्याचे गुण जाणून होत्या. जिरे हे फार चांगले ऍसिड न्यूट्रलायझर आहे. ह्याने अन्नपचन सुधारते तसेच पोटातल्या वेदना सुद्धा कमी होतात. पोटात दुखत असताना जिऱ्याची पूड कोमट पाण्यात घालून प्यायल्यास किंवा जेवणानंतर जिऱ्याचा काढा घेतल्यास पोटाचा त्रास कमी होतो.
८. आलं
आल्यामध्ये तर अनेक औषधी गुण आहेत. आल्यामध्ये अन्नपचनासाठी आवश्यक तसेच दाहशामक गुणधर्म आहेत. पोटातील ऍसिड न्यूट्रलाइज करण्यासाठी आल्याचा तुकडा चावून चोखल्यास किंवा आल्याचा रस घेतल्यास फायदा होतो. मळमळ, उलटी, पित्त वाढणे ह्यावर आल्याचे पाचक तर ट्राईड अँड टेस्टेड औषध आहे.
९. थंड दूध
ऍसिडिटी झाल्यावर गार दूध घेणे हा उपाय सोपा आणि गुणकारी आहे. दुधाने पोटातील ऍसिड कमी होते. दुधात कॅल्शियम असते. कॅल्शियम अल्कलाईन असल्याने त्याने ऍसिड न्यूट्रलाइज होते. ज्यांना दुधाची ऍलर्जी नाही ते हा सोपा उपाय नक्कीच करू शकतात.
(माधवबाग धुळे क्लिनिक यांच्या सौजन्याने)
संकलन – डॉ. देवयानी देशपांडे ८३२९७७७९८४