चोपडा (प्रतिनिधी) पंकज कला व विज्ञान महाविद्यालय, चोपडा येथे भूगोल विभागामार्फत जागतिक हवामान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे मार्गदर्शक दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा येथील भूगोल विभागप्रमुख डॉ. शैलेश वाघ हे होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किशोर पाठक हे होते. प्राचार्य डॉ. आर. आर. अत्तरदे यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांच्या स्वागत-सत्काराने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. शैलेश वाघ यानी सांगितले की, मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे मानव जातीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक हवामान दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. जागतिक हवामान दिन हा आपल्या पृथ्वीला भेडसावणाऱ्या हवामान बदल, जंगलतोड, अतिप्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी अनेक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा दिवस आहे. जागतिक स्तरावर 191हून अधिक देशांमध्ये जागतिक हवामान दिवस साजरा केला जातो. पर्यावरणीय स्थितीबद्दल जागरूकता वाढवण्याच्या अनुषंगाने या दिवसाचे महत्त्व आहे. योग्य वेळी खबरदारी आणि पावले उचलल्यास पृथ्वीवरील अनेक जीव वाचू शकतात. हवामान बदलामुळे जगातील अनेक भागांमध्ये चिंताजनक पर्यावरणीय बदल घडत आहेत. वाढत्या शहरीकरणात पर्यावरणाचा ऱ्हास होतो, असे त्यांनी शेवटी सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले की, हवामान संवर्धनासाठी उपाय केले पाहिजे. शुद्ध हवा ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंदिनी वाघ व आभार प्रा. अजय पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
