मुंबई (साथीदार वृत्तसेवा) महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम, मुंबईची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ज्येष्ठ नागरिक भवन नेरुळ येथे संपन्न झाली. या सभेत 14 प्रादेशिक विभागाचे वर्तमान अध्यक्ष व सचिव व पुढील 2024-27 कालावधीत निवडून आलेले अध्यक्ष व सचिव तसेच मंडळाचे अध्यक्ष, सभासद उपस्थित होते.
सभेत नियामक मंडळाने सादर केलेल्या सन 2023-24 या आर्थिक वर्षांतील कामकाजाचा अहवाल, ताळेबंद पत्रक, उत्पन्न खर्च पत्रक, 2024-25 अंदाजपत्रक व हिशोब तपासणीसाची नेमणूक आदी विषयांवर चर्चा झाली. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नावर अध्यक्ष श्री. अरुण रोडे यांच्याद्वारा उत्तर देण्यात आल्यानंतर सभेत मंजुरी देण्यात आली. यानंतर फेस्कॉम डिजिटल अकादमीच्या कामकाजाचा अहवाल सादर करण्यास आला. यानंतर सन 2024-27 करीता निवडणुकीचा निकाल निवडणूक अधिकारी श्री विकास साठे व टीमद्वारा जाहीर करण्यात आला.
यामध्ये पुढीलप्रमाणे पदाधिकारी बिनविरोध निवडून आले. श्री. अण्णासाहेब टेकाळे, अध्यक्ष. श्री. अशोक तेरकर, उपाध्यक्ष, श्री. चंद्रकांत महामुनी, मुख्य सचिव, श्री. प्रकाश पिंपळकर अतिरिक्त मुख्य सचिव, श्री. मानकर कोशाध्यक्ष, श्री. वसंतराव कळंबे अतिरिक्त कोशाध्यक्ष या सर्व निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा मंत्रोच्चारण करून पदाधिकारी व मंडळाचे अध्यक्ष सचिव यांच्याद्वारा सत्कार करण्यात आला. यानंतर सर्व प्रादेशिक विभागाचे वर्तमान अध्यक्ष सचिव व 2024-27 करिता निवडून आलेल्या अध्यक्ष, सचिव यांचादेखील सत्कार करण्यात आला. फेस्कॉमचे 34 वे राज्यस्तरीय अधिवेशन जेष्ठ नागरिक संघ लातूरद्वारा दिनांक 11व 12 जानेवारी 2025 रोजी लातूर येथे घेण्यात येणार आहे. या अधिवेशनात 3000 ते 4000 प्रतिनिधींची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी सर्व प्रादेशिक विभागातून सभासदांनी अधिवेशनामध्ये सहभाग घ्यावा, अशी विनंती श्री. प्रकाश घातगिने सचिव व आर. बी. जोशी यांनी यावेळी केली. आभार प्रदर्शन, पसायदान व सहभोजनानंतर सभेची सांगता झाली.
फेसकाम महाराष्ट्र 2024 25 ते 2026 27 या कालावधीचा निवडून आलेले नूतन अध्यक्ष श्री अण्णासाहेब टेकाळे उपाध्यक्ष श्री अशोक जी तेरकर, मुख्य सचिव चंद्रकांतजी महामुनी, श्री. प्रकाश पिंपळकर अतिरिक्त महासचिव, श्री मानकरजी कोशाध्यक्ष, श्री. वसंतराव कळंबे अतिरिक्त कोशाध्यक्ष या सर्व निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना समन्वयक, जळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ जळगाव प्रा. एस. बी. महाजन व जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, सचिव व संघटक व सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.
श्री. रोडे साहेब, श्री. नाना इंगळे, श्री.देशपांडे सर, महामुनीजी आणि सर्व कार्यकर्ते यांच्या कामाचे कौतुक किती केले तरी कमीच आहे. त्यांनी फेस्कॉमचे कार्य ग्रामीण भागात पोहोचवले आहे, आणि ज्येष्ठ नागरिक संघटनांमध्ये नवीन संजीवनी देऊन मूर्त स्वरुपात जागृती निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. ज्येष्ठांसाठी असलेल्या कायदे विषयक माहितीपर मार्गदर्शनपर ट्रेनिंग दिले आहे, अनेक उदाहरणे देता येतील. त्यांच्या कार्याला त्रिवार अभिवादन. – प्रमोद डोंगरे, संघटक, फेस्कॉम, जळगाव जिल्हा
सर्व नवनिर्वाचित फेस्कॉम पदाधिकारी आदरणीय आण्णासाहेब टेकाळे यांच्या नेतृत्वाखाली आपले फेस्कॉम निश्चित गत वैभवाप्रत कार्य करेल व हिरेजडित, माणिक मोतीची आपली कार्यपताका फडकावेल अशी खात्री आहे. फेस्कॉमच्या नवीन कार्यकारिणी व पदाधिकारी यांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा.
– अनिलकुमार पालीवाल, ज्येष्ठ पत्रकार, चोपडा