• Sat. Jul 5th, 2025

गणेशपुर परिसरातील शेतकऱ्यांची मागणी
————————————–
नरभक्षक बिबट्याची 9 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या शूटआऊट घटनेची पुनरावृत्तीची गरज
————————————-
चाळीसगाव (साथीदार वृत्तसेवा) गेल्या 14 तारखेला सायंकाळी सात वाजता अनिल (रिंकेश) नंदू मोरे (वय 14 ) या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हापासून गणेशपुर परिसरात भयभीत वातावरण असून, शेकडो एकर जमिनीवर शेतमालक, शेतमजूर, महिला कामगार शेतात जात नसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते आहे, तर दुसरीकडे जीव मुठीत घेऊन ग्रामस्थ आपली दैनंदिन कामे दिवसभरात अंधार पडण्याच्या अगोदर उकरून घेत असल्याची गंभीर आणि विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

येथील ग्रामस्थांनी उन्मेशदादांना फोन करून या घटनेबाबत वन विभागाला मार्गदर्शन करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली या अनुषंगाने काल दुपारी तीन वाजता माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी गणेशपुर ग्रामस्थांची भेट घेतली. याप्रसंगी या शेतकऱ्यांनी उन्मेशदादा आपण या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाला, प्रशासनाला, वन विभागाला मार्गदर्शन करा अशी आर्त हाक दिली आहे.
      

या भयभीत ग्रामस्थांकडून वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी, दुदैवी रींकेश मोरे परिवाराची भेट घेण्यासाठी उन्मेशदादा पाटील यांनी गणेशपुर येथे भेट दिली.


उन्मेशदादांच्या मार्गदर्शनाने मिळाली मदत
सदरची दुर्दैवी घटना घडल्यानंतर उन्मेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनातून वन विभागाने तात्काळ दुदैवी स्व. रींकेशच्या परिवाराला आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा केला. ही मदत त्यांच्या परिवाराकडे सुपूर्द करण्यात आली. मात्र, दुसरीकडे गावात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उन्मेशदादा यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली आहे.

आख्खे गाव दहशतीत
गेल्या 2017 साली झालेली नरभक्षक बिबट्याची करुण कहाणी पुन्हा होऊ नये. अशी भावना गणेशपुर येथील गावकऱ्यांनी उन्मेशदादा पाटील यांच्याकडे केली आहे. वलठाण,चितेगाव,पाटणा, 32 नंबर तांडा, शिंदी असा सुमारे पंधरा किलोमीटरच्या परिघात बिबट्याने मोठी दहशत करून ठेवली आहे. सातत्याने अफवाचे पीक सुरू असताना वरखेडे शिवारात 2017 साली 7 लोकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याची करुण कहाणी पुन्हा चर्चेला आली आहे.


त्यावेळी तत्कालीन आमदार उन्मेशदादा पाटील यांनी राज्यातील वन विभागाला कामाला लावले.आणि एका मागे एक सात लोकांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला मारण्यासाठी देशातील क्रमांक एकचे शार्पशूटर नवाब अली यांना पाचारण केले होते. आणि नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त केला होता. मात्र, सध्याच्या परिस्थितीत वनविभागासह प्रशासनाची उदासीनता दिसून येत असल्याने उन्मेशदादा पाटील आपण या परिसरात बिबट्याच्या बंदोबस्तासाठी मार्गदर्शन करावे अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी तसेच आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी केली आहे.

अधिकाऱ्यांना उन्मेशदादांनी दिल्या सूचना
 14 वर्षीय दुर्दैवी बालकाचा मृत्यू झाल्यानंतर तातडीने त्या परिवाराला मदत मिळावी यासाठी उन्मेशदादा पाटील यांनी वन विभागाकडे पाठपुरावा केला व त्या परिवाराला मदत मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन देखील केले ही बाब गणेशपुर परिसरात ग्रामस्थ यांच्या लक्षात आलेले त्यांनी उन्मेशदादा पाटील यांना सूचना करण्याचे, मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावेळी माजी खासदार उन्मेश पाटील यांनी जळगाव उपवनसंरक्षक (प्रादेशिक)प्रवीण ए  यांना तातडीने पावले उचलावीत, ठिकठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक ए पी पंडित, वन परिक्षेत्र अधिकारी पाचोरा ए एस मुलानी, मानद वन्यजीव रक्षक जळगाव विवेक देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, पोलीस पाटील भागवत पाटील, सरपंच चंद्रकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील, अभय पाटील, त्रिंबक जाधव, दीपक पाटील, सोमनाथ पवार, देविदास पवार, स्वातीताई कुलकर्णी, गोपाळ गोरवाडकर, बेलगंगा संचालक बाळासाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेनकाका जैन, भटक्या सेना तालुकाप्रमुख अनिल चव्हाण यांच्यासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोरगरीब जनतेला आनंदाचा शिधा उपलब्ध करून द्यावा
गेल्या पाच दिवसांपासून परिसरातील मोलमजुरी करणारे आदिवासी बांधव, शेतकरी बंधू भगिनी भीतीपोटी कामावर जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असून शासनाने त्यांना तातडीने रेशन दुकानातून आनंदाचा शिधा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांच्यावतीने उन्मेशदादा पाटील यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे केली.

पाच महत्त्वाच्या बाबींकडे प्रशासनाने लक्ष द्यावे
याप्रसंगी माजी खासदार उन्मेश पाटील यांनी उपस्थित अधिकारी यांना विविध पाच गोष्टींकडे लक्ष देण्याची मागणी करीत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
1) वन्य प्राण्यांमुळे बकरी, शेळी यांचे जे नुकसान झाले ते तातडीने पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी.
2)  रानडुकरांसारख्या वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होते त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.
3)  परिसरातील शेतमजूर शेतात जात असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते आहे.त्यामुळे त्यांना लागलीच आनंदाचा शिधा वाटप करण्यात यावा.
4) एमएसईबीने या भागात कुठलेही लोड शेडिंग न करता 24 तास वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. जेणेकरून भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा मिळेल.
5)  नरभक्षक बिबट्यास बेशुद्ध  करण्याची गरज असून आणखी कोणाचा जीव जाऊ नये यासाठी वन विभागाने तातडीने पावले उचलावी.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.