या पद्धतीने करा आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन
आज मंगळवारी चतुर्दशी सकाळी ९ : ३९ पर्यंत आहे व त्यानंतर पौर्णिमा आहे . या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्यामुळे गणेश विसर्जन करण्याबद्दल अनेक प्रश्न येत आहेत .
उद्या ९ : ३९ पर्यंत चतुर्दशी असल्यामुळे तोपर्यंत आरती , नैवेद्य , उत्तरपूजा करून मूर्ती जागेवरून थोडी हलवावी .
त्यानंतर दिवसभरात कधीही त्या मूर्तीचे विसर्जन करता येते
अनंत चतुर्दशीचे दिवशी म्हणजेच गणपती विसर्जनाच्या दिवशी खालीलप्रमाणे पूजा करावी.
उत्तरपूजा शुचिर्भूत होऊन कपाळाला कुंकू लावावे. आसनावर बसावे. संकल्प करावा.
‘श्री सिद्धिविनायकप्रीत्यर्थ पंचोपचारैः उत्तरपूजनं करिष्ये’
असे म्हणून पंचोपचारांनी पूजा करावी.
श्री सिद्धिविनायकाय नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
( गंध )
श्री सिद्धिविनायकाय नमः । पुष्पाणी समर्पयामि ।
( फुले )
श्री सिद्धिविनायकाय नमः । धूपं समर्पयामि ।
( उदबत्ती ओवाळावी.)
श्री सिद्धिविनायकाय नमः । दीपं समर्पयामि ।
( नीरांजन ओवाळावी.)
श्री सिद्धिविनायकाय नमः । नैवेद्यं समर्पयामि ।
( नैवेद्य दाखवावा. )
विडा, दक्षिणा ठेवावी. नारळ फोडावा. सर्व मंडळीच्या कल्याणासाठी मागणे करावे, म्हणावे-
यांतु देवगणाः सर्वे पुजामादाय पार्थिवीम् । इष्टकामप्रसिद्धयर्थ पुनरागमनाय च ॥
या मंत्राने मूर्तीवर ‘मंगलमूर्ती मोरया’ या नामघोषाने अक्षता वाहाव्या.
अनेन उत्तरपूजनेन श्री सिद्धिविनायकः प्रीयताम् ।
म्हणून उदक सोडावे. नंतर आरत्या म्हणाव्यात. सर्वांनी गणपतीवर गंधपुष्प वहावे. नमस्कार करावा. विसर्जनाच्या अक्षता घालाव्या. मूर्ती जरा सरकवावी. मूर्तीचे विसर्जन वाजतगाजत सर्वांनी मिळून करावे. गणपतीच्या जयजयकार करावा, म्हणावे –
मंगलमूर्ती मोरया ! गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या !