खासदार उन्मेश पाटील यांनी मुंबईमध्ये नगरविकास सचिव यांची भेट घेतली
चाळीसगाव – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या बारा महिन्यापासून चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने शहरवासीयांची कामे खोळंबली होती. तसेच विकासकामांची गती मंदावली आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.
नगरोत्थान योजनेत ९० कोटी, १५० कोटींच्या महत्वाकांक्षी भुयारी गटार योजनेतील पहिल्या टप्प्यातील ७० कोटी, २२ कोटींचा घनकचरा प्रकल्प याचबरोबर कोट्यवधी रुपयांची शहर सुशोभीकरण, एलइडी विद्युत दिवे योजना अशा अनेक योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मोठा निधी आणून शहराच्या विकासाला गती देण्याचे काम सुरू असताना गेल्या बारा महिन्यापासून चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने शहरवासीयांची कामे खोळंबली आहेत. याबाबत खासदार उन्मेष पाटील यांनी मुंबईत नगर सचिवांना भेटून येत्या चोवीस तासात मुख्याधिकारी नेमणूक न झाल्यास मंत्रालयाच्या पायरीवर उपोषणाचा इशारा दिला आहे.
खासदार उन्मेश पाटील यांचा खंबीर पवित्रा घेतल्याने शासन खडबडून जागे झाले असून, येत्या दोन दिवसात मुख्याधिकारी यांची निवड होईल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. अखेर पालिकेचे मुख्याधिकारी नेमणुकीसाठी खासदार पाटील यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेचे शहरवासीयांकडून स्वागत होत असून, नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.