सातारा – (साथीदार वृत्तसेवा) कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड-१९ प्रादुर्भावाच्या सद्यपरिस्थितीचा आढावा व संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना या संबंधिची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली.
यावेळी, सातारा आणि कोल्हापूर या जिल्हयांतील आरोग्यविषयक समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
गंभीर परिस्थितीत गरजू व गरीब बाधितांना विनाशुल्क तातडीचे उपचार मिळावेत या उद्देशाने रेमडेसिवीर या महागड्या इंजेक्शन्सची कुमकही दोन्ही जिल्हयाच्या आरोग्य यंत्रणांना याप्रसंगी देण्यात आली.
या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, सातारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील,कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईकनिंबाळकर, सातारचे खासदार श्रीनिवास पाटील,दोन्ही जिल्ह्यांतील खासदार, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, प्रशासकीय व पोलिस अधिकारी उपस्थित होते.