• Sat. Jul 5th, 2025

चोपडा बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन

आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मागणीला यश

मुंबई (वृत्तसेवा) राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी “बांधा वापरा हस्तांतरित करा” या तत्त्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी व अंबोली या बसस्थानकांचा विकास तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बसस्थानकावर प्रवाशांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा. जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक बसपोर्ट उभारण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या. विधानभवन येथे राज्यातील राज्य परिवहन विभागाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक बोलत होते.

यावेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार चंद्रकांत सोनावणे, एसटी महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन, मुख्य लेखाधिकारी तथा आर्थिक सल्लागार गिरीश देशमुख उपस्थित होते.

परिवहनमंत्री सरनाईक म्हणाले की, शहर, तालुका व ग्रामीण भागातील परिवहन व्यवस्था बळकटीकरणासाठी “बांधा वापरा हस्तांतरित करा” या तत्त्वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग व अंबोली ही बसस्थानक विकसित करण्यात येतील. यावेळी माजी मंत्री केसरकर यांनी अंबोली येथील बसस्थानक पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असून, तेथे सर्व सुविधायुक्त नवीन बसस्थानक बांधण्यात यावे अशी सूचना केली.



छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बसस्थानक येथे वारंवार होत असलेले अपघात लक्षात घेता या बसस्थानक परिसरात रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, अशी स्थानिकांची मागणी विचारात घेतली जाण्याची सूचना माजी मंत्री सत्तार यांनी केली. या संदर्भात परिवहन मंत्री सरनाईक यांनी लवकरच निर्णय घेऊन बसस्थानकात पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक करण्यात यावे याबाबतीत स्थानिक आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सूचना केल्या. मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये असलेला आदिवासीबहुल तालुका म्हणून चोपडा तालुका ओळखला जातो. या तालुक्यातील महत्त्वाचे बसस्थानक म्हणून चोपडा बसस्थानक अत्याधुनिक सोयीयुक्त बनविण्यात यावे, अशी मागणी केली. याबाबत लवकरच निविदा प्रक्रिया राबवून बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर चोपडा बसस्थानक विकसित करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.