• Sat. Jul 5th, 2025

नागरिकांनी न घाबरता तपासणी यंत्रणेस सहकार्य करावे

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महानगरपालिका, नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरोग्य यंत्रणा व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून संशयित रुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत बाधित रुग्ण सापडण्याची शक्यता असल्याने रुग्णांची संख्याही वाढणार आहे. असे असले तरी नागरीकांनी घाबरुन न जाता तपासणीस येणाऱ्या यंत्रणेस सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी  केले.

येथील जिल्हा नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उप जिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोडे आदिसह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव व विशेषत: मृत्यूदर रोखण्यासाठी स्वॅबचे तपासणी अहवालयापुढे किमान 36 ते 48 तासात प्राप्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल. स्वॅबचे रिपोर्ट यायला उशिर होत असल्याने बरेच रुग्ण घाबरून स्वयंस्फुर्तीने स्वॅब देण्यास पुढे येत नव्हते. आता मात्र तशी परिस्थिती नसून स्वॅबचे रिपोर्ट लवकर येणार असल्याने नागरीकांना जास्त वेळ विलगीकरणात रहावे लागणार नाही. त्यामुळे रुग्णांमधील भिती आणि गैरसमज दूर होवून रुग्ण आता मोठ्या प्रमाणात स्वत: तपासणी करवून घेण्यास पुढे येतील.

कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित हॉस्पिटलची क्षमता वाढविणार असल्याने बाधित रुग्ण वाढले तरी त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत मिळणार आहे. कोरोना विषाणुची साथ ही आपल्या सर्वांसाठी नवीन असून आपल्याला सर्वांना एकमेकांना सहकार्य करुन कोरोनाला हद्दपार करणे अधिक सोपे होईल. असे भावनिक आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हावासियांना केले.

महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी जळगाव शहरात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील पंधरवाडा हा कोरोना रुग्ण शोध पंधरवाडा म्हणून राबवत असून नागरिकांनी कोरोना शोध मोहिमेतील यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी

जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी प्रशासन आपल्यापरीने कोरोना विषाणूला रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यांना आपल्या सहकार्याची आवश्यकता असून मुख्यत्वे नागरिकांनी, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क बांधूनच बाहेर पडणे, कामाशिवाय बाहेर जाणे टाळणे आणि विशेष म्हणजे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नागरिकांनी जाणे किंवा त्यातून बाहेर निघणे टाळावे. नागरीकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडविल्यास कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवता येईल.

पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

झेडपी सीईओ डॉ. बी. एन. पाटील

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.