व्याख्याते प्रशांत देशमुख यांचे प्रतिपादन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) जगणं अधिक सुंदर करण्यासाठी दुसऱ्याचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकांचे हात खेचा म्हणजे जगणं आपोआप सुंदर होईल .जशी आपली देवावर श्रद्धा असते, देवाच्या दर्शनासाठी आपण अनेक पायऱ्या चढून दर्शन घेतो तसे आपण आपल्यापेक्षा खालच्या व्यक्तीला हात देत वर नेणं यात खरा आनंद असतो, असे प्रतिपादन व्याख्याते प्रशांत देशमुख यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे पंकजनगर येथे आयोजित जगणं सुंदर आहे या विषयावरील जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, कोरोना काळातही रोटरी क्लब ऑफ चोपडा या संस्थेने विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले. मागील दीड – दोन वर्षाच्या कालावधीत मन सुन्न करणाऱ्या अनेक अघटित घटना घडल्या. दीड-दोन वर्षे जगानं खूप सोसलं. जग आता हळूहळू मोकळेपणाने श्वास घ्यायला सुरुवात करीत आहे.
पूर्वीच्या काळी टीव्ही चॅनेलवर फक्त दूरदर्शन हे एकमेव चॅनेल होते तरीही आपण टिव्ही चॅनेलचा निखळ आनंद घेतला आणि आज हजारो चॅनल्स असून सुध्दा आनंद हरवला आहे. जुन्या मालिकांना उजाळा देत नव्या मालिकाचा परिचय करुन दिला.माणसे पैशाने, शिक्षणाने मोठी झालीत पण मनाने मात्र बारीक, छोटी झालीत त्यामूळे जगण्याची सुंदरता हरवत चालली आहे तेव्हा जगण्याची सुंदरता पुन्हा मिळविण्यासाठी दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधता आला पाहिजे म्हणजे जगणं सुंदर होईल.
जिभेला हाड नसते पण दुसऱ्याचे हाडे खिळखिळे करण्याची ताकद जिभेत असते. काही माणसे जन्मतः खडूस असतात. त्यांना कोणाचे कौतुक करावं वाटतच नाही. दुसऱ्यांचे मनमुरादपणे कौतुक करता आले पाहिजे. तरच आपल्याला जीवनाचा खरा आनंद मिळेल, असेही देशमुख म्हणाले.
कोरोनाच्या या काळात मनं भेदरलेली आहेत. काहींनी जवळची माणसे देखील गमावली आहेत. काहींचा आत्मविश्वास गमावला आहे .उद्योग व्यवसायाचे प्रश्न समोर उभे आहेत. या सर्व बाबींवर मात करण्यासाठी एकदा सज्ज व्हायचं आहे. जगण्याची सुंदरता वाढविण्यासाठी, सकारात्मकता निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे आजच्या व्याख्यानाचे आयोजन असल्याचे ते म्हणाले.
विलास पी पाटील यांची राज्य माय मराठी अध्यापक संघ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच रोटरी क्लब ऑफ चोपडाचे सन २०२० – २१ चे अध्यक्ष नितीन अहिरराव , सचिव ॲड रूपेश पाटील , खजिनदार अर्पित अग्रवाल यांना नागपूर येथे आऊटस्टॅडिंग अवॉर्डने सन्मानित करण्यात आल्याबद्दल तसेच पूनम गुजराथी यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांच्यावर वाढदिवसनिमित्त सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले, सचिव रोटे प्रवीण मिस्त्री, एनकलेव चेअर एम डब्ल्यू पाटील, प्रोजेक्ट चेअरमन रोटे प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश पी. बोरोले, विवेकानंद विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ विकासकाका हरताळकर, जिल्हा बँकेचे संचालक घनःश्याम अग्रवाल, पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चोपडाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, ओम शांती केंद्राच्या मंगलादिदी यांसह सर्व रोटेरियन, शहरातील श्रोता वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ चोपडाचे सचिव प्रवीण मिस्त्री यांनी केले.
व्याख्यानास श्रोत्यांचा भरगच्च प्रतिसाद
जगणं सुंदर आहे या व्याख्यानास शहरातील श्रोत्यांची उपस्थिती मोठया प्रमाणावर होती. त्यात महिला, पुरुष, अबालवृद्ध यांसह सर्वांनी व्याख्यानास भरभरून प्रतिसाद दिला. श्रोत्यांचे चेहरे बोलके असल्याचे व्याख्याते प्रशांत देशमुख आपल्या वक्तव्यात म्हणाले. तसेच चोपडेकरांचे एवढे प्रेम पाहून मी भारावलो असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.