दोन दिवसांत २२५ रुग्ण बरे, आतापर्यंत १६८८ जणांची कोरोनावर मात
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांपैकी २३ जून रोजी ११३, तर २४ जून रोजी ११२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ही जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे. आजपर्यंत १६८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असले तरी बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे, ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे.
कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये तीन महिन्याच्या बालिकेपासून ९२ वर्षीय आजीच्या तर समावेश आहेच. शिवाय विविध व्याधी व जुने आजार असलेल्या रुग्णांसह अनेक कोरोना योध्दांचाही समावेश आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत आणखी २२५ जण बरे झाल्याने आपापल्या घरी परतले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर आवश्यक ते उपचार तातडीने मिळावेत. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासक डॉ. बी. एन. पाटील, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांच्यासह जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहेत.
त्याचबरोबर राज्य शासनानेही बाहेरील जिल्ह्यातील डॉक्टर व परिचारिकांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती करून रुग्णांना वेळेवर उपचार व औषधी मिळत आहे. तसेच नागरिकही वेळेत तपासणीसाठी येत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय व डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजसह शहरातील गणपती हॉस्पिटल व गोल्ड सिटी, भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटल हे सर्व सुविधांसह कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिग्रहीत केले आहे. शिवाय नॉनकोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील एकूण ३३ हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्याच्या विविध ठिकाणी ७८ कोविड केअर सेंटर ३६ कोविड हेल्थ सेंटर तर २४ कोविड हेल्थ हॉस्पिटल तयार करण्यात आली आहेत. याठिकाणी बाधित रुग्णांवर तातडीने व वेळेवर उपचार होत असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित २५८९ रुग्णांपैकी आतापर्यंत १६८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक त्या सुविधा व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी इन्सिडन्ट कमांडर गोरक्ष गाडीलकर, महापालिका क्षेत्रात आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी, महसूल, पोलीस दलाचे कर्मचारी दिवसरात्र परिश्रम घेत असून, त्यांना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचेही चांगले सहकार्य लाभत आहे.
खबरदारीचे आवाहन
नागरिकांनी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. लॉकडाऊनचे पालन करावे व घरातच सुरक्षित रहावे. अनावश्यक गर्दी टाळावी. सुरक्षित अंतर राखावे. मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा. तपासणीसाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले आहे.