जळगाव (जिमाका / अनिलकुमार पालीवाल) : प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून जळगाव शहरात सामुदायिक कवायतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.



जि. प. विद्यानिकेतन, जळगाव येथे आयोजित या कार्यक्रमात माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी व विविध पथकांनी सहभाग नोंदविला. राष्ट्रगीत, वंदे मातरम् व महाराष्ट्र गीताच्या तालावर सादर झालेल्या कवायतींनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
आपल्या मनोगतात खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत, हा दिवस लोकशाही मूल्ये, नागरिकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या अधोरेखित करणारा असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने प्रत्येकाने मनात राष्ट्रभक्तीची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लावणारा हा नयनरम्य कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण, पंचायत समिती जळगावचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोबरे, तालुका क्रीडा अधिकारी अजित तबनी, सरला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
