नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार याचे मार्फत जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन पद्धतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 15 व 16 जुलै रोजी करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून यामधील मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तसेच भ्रमणध्वनीद्वारे घेण्यात येणार आहे.
मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व उपभोक्तांकडून रिक्त पदे www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहे. यासाठी सदर वेब पोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे निकष पुर्ण होणाऱ्या किंवा ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी लॉग इन करावे. अद्याप सेवायोजन नोंदणी न केलेल्या इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर तर ॲड्रॉइड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून महास्वयंम ॲप मोफत डाउनलोड करुन नोंदणी करावी. लॉगिन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे.
भरती इच्छूक नियोक्त्यांनी अधिकाधिक रिक्त पदे संकेतस्थळावर अधिसूचित करावी. याबाबत काही अडचणी असल्यास या कार्यालयाच्या 02564-210026 या दुरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. ऑनलाईन मेळाव्याचा जास्तीत जास्त नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ.रा.म.कोल्हे यांनी केले आहे.
‘नंदुरबार कलेक्टरकडून सूचना’ शिर्षकाखालील संदेश चुकीचा
नंदुरबार जिल्ह्यातील काही व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘नंदुरबार कलेक्टरकडून सूचना’ या शिर्षकाखाली लॉकडाऊनबाबत सूचना देणारा संदेश मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड करण्यात येत आहे. या संदेशात वृत्तपत्र बंद करा, शेजाऱ्यांशी संवाद बंद, बेकरी सामान बंद आदी विविध चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
असा कोणताही संदेश जिल्हा माहिती कार्यालय नंदुरबारतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. हा संदेश नागरिकांमध्ये गैरसमज पसरविणारा असून नागरिकांनी असा संदेश कोणालाही फॉरवर्ड करू नये. कोणी फॉरवर्ड करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रशासनाने दिलेल्या अधिकृत सूचना जिल्हा माहिती कार्यालयाचे ट्टिवटर हँडल @infonandurbar आणि फेसबुक पेज Collector Office Nandurbar वर वेळोवेळी देण्यात येतात, तसेच वृत्तपत्रांमधून प्रकाशित करण्यासाठी पाठविण्यात येतात, असे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी कळविले आहे.