व्यवसाय आणि मनोरंजनाला येणार उधाण
चोपडा (प्रतिनिधी) येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा या ५५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या क्लबच्या माध्यमातून यंदा ६ ते ९ फेब्रुवारीदरम्यान ‘रोटरी उत्सव – २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
रोटरी क्लब ऑफ चोपडा गेल्या अनेक वर्षांपासून शहर व तालुक्यात विविध समाजोपयोगी सेवाभावी व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवत आहे. या कार्यक्रमांना व्यवसाय, मनोरंजनाची जोड देत गेल्या सहा वर्षापासून रोटरी क्लबतर्फे रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
जीवनाचा आनंद रंगे, रोटरी उत्सवाच्या संगे, हा विचार डोळ्यासमोर ठेवत या उत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे.
अरुणनगर जवळील बी. एड. कॉलेजसमोरील मैदानावर होणाऱ्या या उत्सवात व्यवसाय, कृषी उत्पादने, कलाकुसरीच्या वस्तू, कपडे, वाहने, विविध खाद्यपदार्थांची विक्री करणारे अनेक स्टॉल असणार आहेत. तसेच मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाणार आहे. याच परिसरात विविध खेळणी असणारा प्ले झोन देखील असणार आहे. उत्सवाच्या कालावधीत शेतकरी मेळावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष आशिष जयस्वाल यांनी यावेळी दिली.
यावेळी मंचावर प्रकल्प प्रमुख संजय बारी, सहप्रकल्प प्रमुख लीना पाटील, विपुल छाजेड, आदित्य अग्रवाल, चंद्रशेखर साखरे, मानद सचिव विश्वास दलाल, कोषाध्यक्ष निखिल सोनवणे हे उपस्थित होते. तत्पूर्वी आशिष जयस्वाल, संजय बारी, निखिल सोनवणे, आदित्य अग्रवाल, लीना पाटील यांनी उत्सव मैदानाचे विधिवत भूमिपूजन केले. यावेळी रोटरी सदस्य उपस्थित होते.
