चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील समर्थ सायन्स अकॅडमीमधील बायोलाॕजी या विषयात प्रावीण्य मिळविलेल्या 10 वी सीबीएसई, 11 वी व 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कै.शरदचंद्रिकाअक्का पाटील नगरपालिका नाट्यगृहात अतिशय उत्साहात पार पडला.
व्यासपीठावर माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, शारदा क्लासेसचे प्रकाश देशमुख, डॉ.पांडुरंग वंजी सोनवणे, अग्रसेन कोचिंग क्लासेसचे संचालक विनोद अग्रवाल, पत्रकार संदीप ओली, समर्थ सायंस अकॅडमीचे संचालक घनशाम पाटील आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक घनशाम पाटील यांनी करीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तद्नंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.
विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांनी आवड असलेल्या क्षेत्रात आपले करिअर करावे असे सांगत समाज व देशाची सेवा नोकरीच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. पालक म्हणून विनोद अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सातत्याने यशप्राप्ती नक्की होते
अध्यक्षीय भाषणांत बोलतांना अरुणभाई गुजराथी म्हणाले की, इथे गुणवंतांमध्ये मुलींची संख्या बघितल्यावर भविष्यात प्रत्येक क्षेत्रात मुलांपेक्षा मुलीच आघाडीवर असतील असे चित्र डोळ्यासमोर उभे राहत आहे. सात्यताने प्रयत्न केल्यास यशप्राप्ती निश्चित होते असा कानमंत्रही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाग्यश्री चौधरी हिने, तर आभार प्रदर्शन देवश्री भट हिने केले. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरमने करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समर्थ सायन्स अकॅडमीचे संचालक घनशाम पाटील, तुषार मराठे, सादिक शेख व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.