
हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ या तीनही नियतकालिकांचे संपादक व लेखक आनंद अंतरकर यांचे निधन झाल्याचे वृत्त कळले. या तीनही नियतकालिकांची मोठी छाप असलेले एक युग होते. अभिरूचीसंपन्न , विनोदी, रहस्यमय अशा सर्व प्रकारच्या, मध्यमवर्गीय वाचकांच्या गरजा वर्षानुवर्षे या तीनही नियतकालिकांनी भागवल्या आहेत.
‘नवल’ मधल्या रहस्यकथांचाही दर्जा वाखाणण्याजोगाच. रहस्य कथांबाबतची जाण जशी ‘नवल’ ने समृद्ध केली तशीच ‘हंस’ ने वाङ्मयीन दर्जा म्हणजे काय याचे मध्यमवर्गाला भानही आणून दिले. चित्रपट विषयकही जाण जपली गेली.
‘हंस’ मध्ये तर अगदी वार्षिकामधूनही दर्जा नीट जपला जातो. माझ्यासारख्या नव्या कवीच्या अनेक कविता ‘हंस’ मध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. ‘मोहिनी’ मधून व्यंगचित्रे, विनोद, विनोदी साहित्य विशेषत्वाने पोहचवले गेले. या तीनही नियतकालिकांचे दिवाळी अंक हे तर मराठी दिवाळी अंक संस्कृतीचे भूषण ठरले आहेत. अंतरकरांची संपादन दृष्टी त्यामागे होती. पुढच्या त्यांच्या पिढीनेही तो वारसा जपला आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
- डॉ. संजीवकुमार सोनवणे