• Fri. Jul 4th, 2025

हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत जवान चेतन चौधरी यांना अखेरचा सलाम

बीएसएफ जवानांसह जिल्हा पोलीस दलाकडून सलामी देऊ मानवंदना; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


चोपडा (प्रतिनिधी) चोपडा येथील गुजरअळी भागातील जवान चेतन पांडुरंग चौधरी दिनांक 11 मार्च रोजी मणिपूर राज्यात 37Bn BSF ची तुकडी अतिसंवेदनशील भागात कार्यरत होते. त्या भागात 11 जवान हे आरोपी ड्युटी करून परत येत असताना काळाने त्यांच्यावर घात केला व त्यांची गाडी दीडशे ते दोनशे फूट दरीत कोसळली. यात 11 जवानांपैकी तीन जवान जागेवरच शहीद झाले आणि बाकीचे गंभीर स्वरूपात जखमी झाले होते. जखमी जवानांना सैनिक रुग्णालय इम्फाल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले होते. या जवानांमध्ये चोपडा शहरातील रहिवासी चेतन पांडुरंग चौधरी हेसुद्धा मृत्यूशी झुंज देत होते. अखेर 15 मार्च रोजी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.

ही दुर्दैवी वार्ता शहीद चेतन पांडुरंग चौधरी यांच्या कुटुंबीयांना कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आपला लाडका सुपुत्र देशासाठी कार्यरत असताना शहीद झाल्याचे समजताच चेतन यांच्या आई वडिलांना भरून आले. चोपडेकरांनाही या बातमीमुळे गहिवरून आले होते. शहीद चेतन चौधरी यांचा मनमिळाऊ स्वभाव, देशासाठी असलेली समर्पणाची भावना याबद्दल अनेकांनी समाज माध्यमांवर पोस्टद्वारे बोलून दाखविली.

शहीद चेतन पांडुरंग चौधरी यांचे पार्थिव चोपडामध्ये येताच आदरांजली वाहण्यासाठी हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी शिरपूरकडून येत असताना चोपडा येथील प्रताप विद्यामंदिर, कस्तुबा माध्यमिक विद्यालय या शाळांतील विद्यार्थ्यांनी शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करून ‘शहीद जवान चेतन चौधरी अमर रहे अमर रहे’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहीद जवानचे पार्थिव नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. पुढे राहत्या घरी मुखदर्शनासाठी शहीद जवानाचे पार्थिव परिवाराला मुखदर्शन देण्यात आले. जळगाव पोलीस दलातर्फे सलामी घेऊन  सजवलेल्या ट्रॅक्टरवर शहीद जवानाचे पार्थिव ठेवून त्यांच्या परिवारासह पत्नी दोन्ही मुले, आई-वडील, भाऊ व नातेवाईक सोबत होते. शहीद जवानाच्या आदरांजली दोनशे फूट तिरंगा जनसमुदायतर्फे हाती घेण्यात आला होता. ‘शहीद जवान अमर रहे अमर रहे’च्या घोषणा देत महिलांसह ध्वज घेऊन चालत होते. रॅली घरापासून ठिकठिकाणी शहीद जवानावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गाने मेन रोड, गोल मंदिर, आशा टॉकीज चौक, रामपुरा येथील स्मशानभूमीत शहीद जवान चेतन चौधरी यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. या वेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आ. चंद्रकांत सोनवणे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय कावेरी कमलाकर, चोपडा शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाल्टे यांच्यासह बीएसएफचे जवान, जिल्हा सैनिक दल, माजी सैनिक यांच्यासह मान्यवरांकडून मानवंदना देण्यात आली. राष्ट्रीय ध्वज शहीद जवानांची पत्नी राष्ट्रीय ध्वज देण्यात आला.

यावेळी बीएसएफ जवानांचे अधिकारी बी. एन. मुक्तेश्वर यांना वीरपत्नी यांनी सांगितले की, माझा मुलगा अठरा वर्षे होईल तेव्हा त्याला नोकरीला लावा, मला माझी पेन्शन सुरू ठेवा. धार्मिक विधीसह शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


यावेळी तालुक्यातील नागरिक विविध पक्षाचे पदाधिकारी, मुस्लिम बांधव यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. चेतन यांना आई-वडिलांनी फार कष्ट करून देशसेवेसाठी पाठवले होते. पण, काळ त्याला हिरावून नेला. चेतन यांच्या सेवेला तेरा वर्षे पूर्ण झाले होते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.