• Sat. Jul 5th, 2025

शेतीपंपांची वीजतोडणी थांबवण्यासाठी उद्या शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन

शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. नाना पाटील यांची माहिती

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) सध्या वीज मंडळाने गावातील पाणीपुरवठा व पथदिव्यांची वीजतोडणी सुरू केली आहे. अर्थात ग्रामपंचायतींना वित्त आयोगाकडून आलेल्या निधीतून तो भरावयाचा असल्याने त्याला शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र, वीज मंडळाने त्यांचे लाईनमनमार्फत प्रत्येक गावात वीज बिल भरा, अन्यथा वीज तोडण्यात येईल असा इशारा दिला त्याला आमचा विरोध आहे, अशी भावना शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. नाना पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान, याबाबत शेतकरी सोमवारी २९ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती पाटील यांनी ‘साथीदार’शी बोलताना दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने जळगाव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करून वीज तोडणी थांबवावी, तसेच यापुढे अश्र्वशक्ती (हॉर्स पॉवर) नुसार वीजबिल आकारणी करावी या प्रमुख दोन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यातर्फे देणार असल्याचंही ते म्हणाले.

काय म्हणाले एस. बी. पाटील…
बंधूंनो,भारतात घराची असो की शेतीची सगळ्यात महाग वीज महाराष्ट्रात आहे. खर म्हणजे देशात योग्य व्यवस्थापन व अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास व ते ऐकून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले तर रेल्वे ने प्रगती करून ८ वर्ष भाडेवाढ न केल्याचे लालू प्रसाद यादव यांनी दाखवून दिले.

दिल्लीत वीज चोरी रोखून देशातील सर्वात स्वस्त वीज देणारे राज्य हे दिल्ली आहे हे अरविंद केजरीवाल यांनी सिध्द केले. म्हणजे वीज बिल कमी करणे हे योग्य व्यवस्थापन व वीज चोरी रोखल्याने शक्य आहे, ते न करता आपले लोक जे नियमित भरणारे आहेत त्यांना जास्त दर आकारून तोटा भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

शेतकरी पीक लावण्याच्याआधी मशागत व जमीन तापू देणेसाठी एक महिना घेतो. म्हणजे त्या काळात पंप बंद असतो पावसाळ्यात पाऊस पडला की आठ आठ दिवस पाणी देण्याची गरज नसते. हे वर्ष वगळता त्याकाळात जवळ जवळ तीन महिने पंप बंद असतो, पाण्याचे दोन पाळ्यामध्ये किमान आठ ते पंधरा दिवस गॅप असतो, ठिबक असेल तर ती रोज दोन तास ते तीन तास चालवली जाते. बारमाही पीक जसे ऊस असेल तर काढणीआधी पंधरा दिवस पाणी बंद करावे लागते.

९५% शेतकरी अल्पभूधारक असल्याने पाच एकर मध्ये तो पाणी देवून देवून किती देणार. यात वादळ, वीज बंद याचा कालावधी धरला तर वर्षातून जास्तीत जास्त ३० ते ४०% वेळ वीज पंप चालतो.आणि शेतकऱ्या ना आकारणी केली जाते १२ महिने दररोज पूर्णवेळ वीज दिली असे गृहीत धरून, एकही दिवस खंड नाही आणि हो जगात सर्व दूर रात्री १०:०० ते सकाळी ६:०० वाजेपर्यंतची वीज स्वस्तात किंवा फुकट दिली जाते. कारण, तुमचे जनरेशन ज्यांना गृहीत धरून केले जाते त्यांचा तेव्हा वापर नसतो पण महाराष्ट्रात तसे घडत नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

पूर्वीप्रमाणे अश्वशक्तीवर आधारित वीजबिल आकारा
शेतकऱ्यांना वीजबिल सवलतीचे दरात दिले जाते असे दाखवले जाते प्रत्यक्षात वहन आकार,स्थिर आकार,इतर आकार असे लावून प्रत्यक्षात तो वीजदर हा खूप जास्त जातो. ज्या अर्थी वापर ४०% आहे व बील १००% चे आकारले जाते हा शेतकऱ्यांवर अन्याय असून, ही धडधडीत लूट आहे. आम्ही शेतकरी मागणी करतो की, खान्देशात शेतकरी शेतात राहत नसल्याने मीटर टिकणे शक्य नाही त्यासाठी पूर्वीप्रमाणे अश्वशक्तीवर आधारित व जे महाराष्ट्राच्या तुलनेने कमी प्रगत राज्य आहेत त्यांच्या दरानुसार आकारा आम्ही पूर्ण वीजबिल वेळचे वेळे भरण्यास तयार आहोत, अशी मागणीही पाटील यांनी ‘साथीदार’शी बोलताना केली.

तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन
प्रत्येक गावातील शेतकरी मित्रांना विनंती आहे की, आपण स्वयंसेवक म्हणून काम करा, सोबत दिलेल्या निवेदनावर आपल्या गावातील शेतकऱ्यांचे सह्या आणा आणि ते निवेदन घेवून तहसील कार्यालय चोपडा येथे सोमवारी सकाळी ११:०० वाजता जमावे, असे आवाहन एस. बी. पाटील यांनी केले आहे. यासोबतच विविध राजकीय पक्षांच्या आणि संघटनेच्या पदाधिकऱ्यांनाही पाटील यांनी या आंदोलनात विना राजकारण करता सामील होण्याचे आवाहन केले आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.