चोपडा (साथीदार वृत्तसेवा ) येथील जुन्या दत्त मंदिरातील ऋषितुल्य कै. अयाचित आजोबांच्या सुविद्य पत्नी श्रीमती विभावरीताई अयाचित (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्या अतिशय धार्मिक होत्या. दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव , भागवत कथा वाचन , कीर्तन, भजन , महाप्रसाद.. असे सर्व कार्यक्रम त्या खूप नेटकेपणाने आयोजित करत असत.
सामाजिक कार्यांत भाग घेऊन त्यांनी सर्वांना मदत करून खूप माणसे जोडली होती. महिलांना सक्षम करताना त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे त्यांना जास्त आवडत होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष गुण म्हणजे मणी, टिकल्या, कापडाचे तुकडे अशा टाकाऊ वस्तूंतून त्या सुंदर कापडी बाहुल्या आणि महालक्ष्मीचे कापडी हात बनवत असत. ही कला इतर महिलांनी शिकावी असा त्यांचा आग्रह असे. त्यासाठी त्या मोफत शिक्षण देत असत.
भुकेल्यांना अन्नदान करणे त्यांना आवडत असे. त्यांचे अभ्यासू आणि कलाप्रिय आनंदी आणि समाधानी व्यक्तिमत्त्व होते. अनेक परिचित, नातेवाईक आणि सामाजिक क्षेत्रांतील श्रेष्ठांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. साथीदार न्यूज डॉट कॉम परिवारातर्फे श्रीमती विभावरीताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली.