समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथे क्रीडा महोत्सवाची उत्साहात सुरुवात
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) मंडळ चोपडा शैक्षणिक संकुलातील समाजकार्य महाविद्यालय चोपडा च्या मैदानावर भव्य क्रीडा महोत्सवाची सुरुवात आज पासून झाली. या क्रीडा महोत्सवात भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या सर्व विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते.
प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून प्रतिष्ठित उद्योगपती आशिष भाई गुजराथी, भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा सौ पुनम गुजराथी, उपाध्यक्षा सौ. छाया गुजराथी, सहसचिव सौ अश्विनी गुजराथी, चोपडा तालुका क्रीडा समन्वयक राजेंद्र आल्हाट, ग.स. संचालक मंगेश भोईटे, चोपडा तालुका शासकीय क्रीडा समिती सदस्य अमोल पाटील, तालुका शासकीय क्रीडा समिती सदस्य ललित सोनवणे, विवेकानंद विद्यालयाचे विजय पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौदाणकर, उप प्राचार्य डॉ. आशिष गुजराथी, आदी मान्यवर विचारपीठावर हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकार्य महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. मारोती गायकवाड यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी क्रीडा आयोजनाची पार्श्वभूमी आणि महत्व विशद केले. मंगेश भोईटे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे आणि शारीरिक सुदृढतेचे महत्व पटवून दिले. महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष श्री अरुण भाई गुजराथी यांनी खेळामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असल्याचे नमूद करत प्रत्येक विद्यार्थ्याने दिवसातून एक तास तरी मैदानावर विविध खेळ खेळावेत असे आवाहन केले.
या क्रीडा महोत्सवात भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलातील सर्व विभागातून विविध खेळाडूंनी विविध खेळांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे. हा क्रीडा महोत्सव दिनांक 21 जानेवारीपासून सुरू होऊन त्याची सांगता दिनांक 25 जानेवारी रोजी होणार आहे. यादरम्यान विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलातील सर्व विभाग प्रमुख, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळत आहे. सर्व विभागातील क्रीडा शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ. राहुल निकम यांनी केले. क्रीडा महोत्सव करिता विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
