बँकेच्या मनमानी कारभाराविषयी ग्रामसभेत बहूमताने ठराव मंजूर
अडावद (साथीदार वृत्तसेवा) येथील भारतीय स्टेट बँक शाखा क्रमांक २१३६ मध्ये गेल्या आठवड्यापासून अलिखित फतवा काढण्यात आला असून, खातेदारास २० हजार रुपयांच्या आतील भरणा तसेच १० हजार रुपयांच्या आतील रक्कम बँक शाखेतून मिळणार नाही त्यासाठी ग्राहकांना ग्राहक केंद्रात जावून व्यवहार करण्याचा अजब सुलतानी फतवा बँकेच्या कँशिअरने काढल्याने ग्राहकांना बँकेच्या सुविधापासून वंचित ठेवून बँकेचे ग्राहक तोडण्याचा प्रकार खुद्द बँकेकडूनच होत आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात बहुमताने ठराव मंजूर करून बँकेच्या वरिष्ठांकडे ग्रामसभेचा ठराव पाठवून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

अडावद ग्रामपंचायतीची ग्रामसभा २८ रोजी सकाळी १० वाजता बस स्टँन्ड शेजारी वार्ड क्रमांक ३ मध्ये लोकनियुक्त सरपंच सौ.भावना माळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेत उपसरपंच सौ. भारती महाजन, सदस्य जावेद खान, ग्रामविकास अधिकारी विलास साळुंखे, कृषि सहाय्यक प्रशांत पवार आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
शासनाचे जी.आर.आणि आलेले अर्जाचे लिपिक प्रेमराज पवार यांनी वाचन केले. आजच्या सभेत अडावद स्टेट बँकेच्या मनमानी कारभारा विषयी जनतेने मोठा रोष व्यक्त केला. एटीएम बंद ठेवणे, बँकेतील कार्ड स्वँप मशिन बंद ठेवून ग्राहकांना व्यवहारासाठी ग्राहक केंद्राची वाट दाखविणारी शाखा शेकडो खाते निष्क्रिय करण्याचा घाट घालून गावात नव्याने येणाऱ्या दुसऱ्या बँकेस आयते ग्राहक तर जोडायला भाग पाडत नाही, असा आरोप ग्रामसभेत ग्रामस्थांनी केला आहे. असे करीत इतर केंद्रावर व्यवहार केल्यास ग्राहकांना कमिशन चार्जेस द्यावे लागतात तो आर्थिक भुर्दड सहन करावा लागतो तरीही बँक ग्राहकांना ग्राहक केंद्राचा रस्ता दाखवित असल्याने बँक कर्मचाऱ्यांचे काही अर्थपूर्ण सटेलोटे तर बांधले नसल्याचा सवाल ग्रामसभेत उपस्थित करण्यात आला. बँकेच्या विरोधातील हा ठराव ग्रामस्थांनी एकमुखाने मंजूर केला असून, त्याचा अहवाल महाप्रबंधक मुबंई, सहाय्यक महाप्रबंधक औरंगाबाद, क्षेत्रीय कार्यालय जळगावसह रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे.
ग्रामसभेत ग्रामस्थांच्या मूलभूत समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाच्या १४ व १५ व्या वित्त आयोगातील कामांचा गोषवारा घेण्यात आला.
योजना मंजूर झाल्याने अभिनंदनाचा ठराव
ग्रामपंचायतीने महाआवास अभियानातंर्गत १५१ घरकुलांचे निर्मितीची भरीव कामगिरी करून महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागातर्फे देण्यात येणारा जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट क्लस्टर महाआवास अभियान पुरस्कार मिळविल्याने माजी सरपंच हाजी कबिरोद्दीन दिलफिरोज शेख यांनी सरपंच, उपसरपंच आणि ग्राम विकास अधिकाऱ्यांचा सत्कार करीत ग्रामपंचायतीच्या कार्याचा गौरव करीत अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. सोबतच पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी आ. चंद्रकांत सोनवणे,आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने अडावदला २८ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही ग्रामसभेत बहूमताने पारित करण्यात आला.