मृतांमधील दोघे सख्खे भाऊ असून एक चुलतभाऊ
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील विरवाडे येथील तीन तरुणांचा आज दुपारच्या वेळी गुळ प्रकल्पातील डोहात बुडून मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. मृतांमधील दोघे सख्खे भाऊ असून एक चुलतभाऊ आहे.
आज तालुक्यातील विरवाडे येथील काही तरुण गुळ धरणावर गेले होते. यातील सुमीत गिरासे (पाटील); ऋषी गिरासे (पाटील) आणि कुणाल गिरासे (पाटील) हे तीन तरूण पोहण्यासाठी पात्रात उतरले असता ते डोहात बुडाले. ही माहिती मिळतच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचे मृतदेह शोधण्यास प्रारंभ केला. काही तासांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचे चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.
मृतांपैकी सुमीत आणि कुणाल हे सख्खे भाऊ असून ऋषी हा त्यांचा चुलतभाऊ आहे. तिन्ही जण हे विशी-बावीशीतील असून त्यांच्या अकाली मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. गुळनदी निझर देव जवळ एका खोल डोहा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.