• Sat. Jul 5th, 2025

लेखक – डॉ. पंकज पाटील, चोपडा

मानवजातीवर आजपर्यंत असे गंभीर संकट आपण जिवंत असणाऱ्यांच्या काळात कधी आलेले नाही. सर्व जग, देश कोरोनाशी युद्ध लढतोय. जो तो ज्याच्या त्याच्या यथाशक्ती प्रयत्नाने लढतोय. आपणही त्यात भाग घेतोय, लढतोय.

   आपल्याला देश वाचवायचाय, राज्य, जिल्हा, शहर आणि गाव वाचवायचे आहे.  
कुटुंबीय, मित्रमंडळी, समाज वाचवायचाय.
माणूस आणि माणुसकी वाचवायची आहे.
युद्ध दीर्घकाळ किंवा प्रदीर्घकाळ चालणार असे दिसतेय.

   आपण सर्वांनी एक नवीन *’चोपडा पॅटर्न’* तयार करून लढा अजूनतरी जिवंत ठेवलाय, कोरोनाला जिंकू दिलेले नाही तसे आपणही अजून जिंकलो नाही. देवही आपली परीक्षा पाहतोय.

   करोना बद्दल अजूनतरी १००% खात्रीशीर अभ्यास जगात नाही. जशी वेळ जातेय तसे रोज नवीन काहीतरी शिकायला भेटतेय. १००% खात्रीशीर औषधोपचार व लस मिळाल्यास आपण नक्कीच जिंकू, पण तोपावेतो आजपर्यंत घेतली तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्त काळजी घेण्याची वेळ आहे. सर्व सूचना शासनाने, प्रशासनाने, प्रसारमाध्यमांनी केलेल्या आहेतच. पुन्हा एकदा आठवून पहा, पाळा.

   शहरी भागात ज्याप्रमाणे आपण सामूहिक तपासणी अभियान सूरु केले आहे ते तसेच पुढे सुरू ठेवण्याची वेळ आहे. प्रशासन प्रयत्न तर करतेच आहे आपणही आपले प्रयत्न हे युद्ध जिंकेपर्यंत सुरूच ठेवायचे आहेत. काही भागात तपासणी कमी पडत असेल तर तेथील स्थानिक डॉक्टर्स समाजमित्र मदतीला घेवून आपले काम सूरुच ठेवूया.

   ग्रामीण भागातील संसर्गाबद्दल काळजी वाटावी अशी स्थिती निर्माण होते की काय अशी शंका यायला लागलीय. अजूनही ग्रामीण बांधवांना तसेच काही शहरी बांधवांना प्रबोधनाची, मार्गदर्शनाची गरज आहे असे वाटते.

   ग्रामीण भागात ‘ग्राम आरोग्य समिती’ व शहरी भागात ‘वॉर्ड आरोग्य समिती’ स्थापन करण्याची नितांत गरज आहे. त्यात त्या भागातील आशा, अंगणवाडी सेविका, डॉक्टर्स, तलाठी, पोलीस पाटील, सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग असावा. त्यांना ह्या ग्रुपवर झाले तसेच शास्त्रीय प्रतिबंधात्मक उपचारात्मक मार्गदर्शन व्हावे. हिंमत देण्याची व काही ठिकाणी हक्काने रागावण्याची गरज आहे.

  समित्यांनी शासनाने देण्यापेक्षा स्वतःहून लोकसहभागातून digital thermometer व oxygen saturation करता पल्सऑक्स मीटर घेवून सुरुवात करावी. गावातील/वॉर्डातील सर्वांची नियमित तपासणी करून घ्यावी. रोज गावात/वॉर्डात जाणारे व येणाऱ्यांची तपासणी व संशयितांची माहिती प्रशासनास कळवणे सुरू करावे. ज्येष्ठ, गर्भवती, लहान मुलं, इतर दीर्घ आजार असणाऱ्यांची काळजी जास्त घ्यावी, त्यांची यादी बनवून ठेवावी. शंका असल्यास स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यास व डॉ ना कळवावे.

   सोबतच ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली तरुणांचे ‘ग्राम सुरक्षा दल’ बनवले तर उत्तम.
मास्क न लावता उगाच टोळके करून गप्पा मारणारे, चौकात चकाट्या पिटणारे, काही कारण नसतांना उंडाळणारे यांची व्यवस्था स्थानिक ज्येष्ठांनी लावावी, अन्यथा पोलिसांचे काम वाढेल.
महिला बचत गटास किंवा गावातील दबंग महिला नेतृत्वास याबाबतीत मदतीला घेता येईल अशी माझी सूचना आहे.

‘तंटा मुक्त समिती’, ‘आदर्श गाव समिती’ किंवा आधी अस्तित्वात असतील अशा समिती/गट पुन्हा जिवंत करून मदतीस घ्याव्यात. 
  
शासन मान्यतेने गावातच समाजमंदिर, शाळा वै ठिकाणी छोटेसे ‘विलगीकरण केंद्र’ तयार करून इतर आजार नसणारे धडधाकट संशयित बांधवांना तेथे ठेवून उपचार सुरू केल्यास उत्तम. घरगुती विलगिकरणापेक्षा हे चांगले राहील. सर्वांची नियमित तपासणी, उपचारासाठी सोपे होईल. एकमेकांना मानसिक धीर देणे समजून घेणे सोपे होईल. संशयित आपल्याच गावात आपल्याच मित्रमंडळी सोबत, नातेवाईकांसमोर असले की बरे वाटते, भीती कमी होते. त्रास वाढलाच तर ccc, dchc, dch आहेच मदतीला. (पण तशी वेळ येवू न देणे आपल्याच हातात आहे.)

कुणास अजून काही सुचना असतील तर नक्की पुढे यावे

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.