• Sat. Jul 5th, 2025

भारतीय संस्कृतीचे प्रतीक : गणेश चतुर्थी

जाणून घ्या, गणेश चतुर्थी संबंधीचे महत्त्व, तसेच काय करावे आणि काय करू नये :

‼🕉भाद्रपदातील श्रीगणेश उत्सव – मुहूर्त संबंधी शास्रार्थ .‼

!! 🕉🚩ज्योतिषी मनुरकर विजयम् !!

सनातनाचे ( भारतीयांचे ) सर्व सण, व्रतांकरता तिथी हे प्रधान कारण आहे.

तिथि: शरीरं तिथिरेव कारणम् l

नक्षत्र हे प्रधान नसून प्राशस्त्य बोधक आहे.
म्हणूनच सण, व्रता साठी विशिष्ट मुहूर्तांची आवश्यकता नसते. तर नक्षत्रां साठी विशिष्ट मुहूर्तांसाठी आवश्यकता असते.

ह्या महिन्यातील पार्थिव गणेश स्थापना ( प्राण-प्रतिष्ठा )पूजन करण्यासाठी शास्त्रकारांनी विशिष्ट मुहूर्त दिलेले नाहीत.

सूर्योदया पासून मध्याह्नकाला पर्यंत ( सामान्यत: दुपारी १ll वाजेपर्यत ) कोणत्याहि वेळी स्थापना ( प्राण-प्रतिष्ठा )पूजन करता येते. निदानपक्षी स्थापना व पूजनाचा संकल्प ह्या मर्यादा वेळेतच होणे अत्यावश्यक आहे. पूजा-विधीस वेळ लागल्यास हरकत नाही.

त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, स्थिर राशींचा कालावधि, भद्रा (विष्टि करण), चौघडीया मुहूर्त (अमृत, लाभ) इत्यादि वर्ज्य नाहीत म्हणून ते पाहू नयेत.

उजव्या सोंडेचा गणपति कडक आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत करुन घेणे चुकीचे आहे. सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना l असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे. बाप्पाची शुंडा आहे ती. इकडे वळविली काय नि तिकडे वळविली काय ? बाप्पाचा प्रश्न आहे तो.

पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुक्ल ( शुध्द ) चतुर्थी हा एकच दिवस असल्याने, त्या दिवशी जमले नाही किंवा चतुर्थीपूर्वी अशौच (सोहेर, सूतक) संपत नसेल, तर त्या वर्षी गणपति बसवू नये. पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येणार नाही. म्हणूनच ह्याला नित्य नैमित्तिक व्रत म्हटले आहे.

गणपति बसविणे हा कुलाचार नाही, तर ती एक वार्षिक व्रतात्मक पूजा आहे.

नित्य प्रतिवर्षीनैमित्तिक भाद्रपदातील शुक्ल ( शुध्द ) चतुर्थीचे च दिवशी. एका वर्षी लोप (म्हणजे ते न करणे) झालेला चालेल. पुढील वर्षी गणपति पूजन करतां येईल.

गणपति हा देव असा आहे की, तो कुणावरही रागवत नाही. म्हणूनच तो सर्व थरांमध्ये लोकप्रिय आहे. ह्या बाबतीत कोणतीही भीती किंवा संदेह मनी बाळगू नये. परंतु भयापोटी कोणी पुढे आश्विन मासातील नवरात्रात विनायक चतुर्थी स राहिलेले गणपति पूजन करतात. मात्र ह्यास शास्त्राधार नसल्याने तसे करु नये.

उत्सवाचे दिवस कमी किंवा जास्ती (१० चे १|| किंवा १|| चे १०) करण्यास शास्त्राची कोणतीहि हरकत नाही. ह्याबाबतीत कोणतेही भय अथवा संदेह मनी बाळगू नये. जास्तीत जास्त १० दिवस हा उत्सव करतां येतो. उत्सव झाला की, ह्या पार्थिव गणपतीचे विसर्जन केलेच पाहिजे. कोणत्याहि कारणाने तो तसाच ठेवू नये.

दरवर्षी मूर्ति ठेवून पुढील वर्षी विसर्जन करणे शास्रसंमत नाही, म्हणून दरवर्षीची मूर्ति ठेवू नये.

गणपति स्थापना ( प्राण प्रतिष्ठा ) व पूजन झाल्यावर अशौच (सोहेर, सूतक) आले, तर दुसऱ्याकडून लगेच गणपति विसर्जन करुन घ्यावे. अशा वेळेस उत्सवाचे दिवस कमी झालेले चालतील.

मूर्तीची स्थापना ( प्राण प्रतिष्ठा )पूजन झाल्यानंतर, उत्सवाचे दिवसात काही कारणाने गणेश मूर्ति भंगली असता, लगेच विसर्जन करावे. त्यानंतर पुन: गणेश मूर्ति आणून पूजन करु नये.

मूर्तीची स्थापना ( प्राण प्रतिष्ठा )पूजन करण्या पूर्वी काही कारणाने मूर्ति भंगली असतां, लगेच दुसरी मूर्ति आणून तिची स्थापना (प्राण प्रतिष्ठा )पूजन करावे.

घरामध्ये गर्भवती स्त्री असल्यास गणेश मूर्तीचे विसर्जन करतां येते. अशा वेळेस विसर्जन न करण्याच्या रुढीला शास्त्राधार नाही.

आपल्या प्रथा दिवस प्रमाणे गणपति विसर्जन करतांना मंगळवार किंवा मूळ नक्षत्र असतानाही मूर्ति विसर्जन करतां येते.

मूर्तीची उत्तरपूजा झाल्यानंतर जलाशयात विसर्जन करणेपूर्वी पुन: आरती करण्याची जरुरी नाही. कारण मूर्तीतील ‘प्राण-प्रतिष्ठा’ विसर्जित झालेली असते.

घरातील एखादी व्यक्ती आई किंवा वडील मृत झाल्यावर, त्यांचे अंत्येष्टी विधी ( १४ दिवस ) पूर्ण झाल्यावर , एक वर्षाचे आंत गणपति सण आल्यास, नेहमीप्रमाणे, परंपराप्रमाणे श्रीगणेश पूजन करावे, गणपति बसवावा.

गणपति जसा विघ्नहर्ता आहे, तसाच तो वक्रतुण्ड सुध्दां आहे. त्याचा शास्त्रीय अर्थ असा आहे ——-

वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्ड : |

वक्र गतीने चालणारे व वक्र वाणीनी बोलणारे, अशांना शिक्षा करुन, जो सरळ मार्गावर आणतो, तो वक्रतुण्ड !

वडील हयात असले किंवा नसले, भाऊ-भाऊ विभक्त ( वेगळे-वेगळे ) राहात असले तरीही प्रत्येकाने आपापल्या घरीच वर्षातील कुलधर्म – कुलाचार, पितृचार ( पितरांचे प्रतिसांवत्सरिक श्राध्द ), सण, व्रते करावीत.

पृथक् विवर्धते धर्म: तस्मात् धर्म्या: पृथक् क्रिया:

प्रत्येकाने हे सर्व केल्याने धर्म वाढतो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरीच सर्व धार्मिक कृत्ये करणे, धर्मशास्त्र संमत आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.