ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालिवाल यांची राज्यपाल यांच्याकडे मागणी
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक तथा अध्यक्ष विनोद पत्रे यांना राज्यपाल महोदयांनी विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालिवाल यांनी राज्यपाल यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.
विनोद पत्रे यांना विधान परिषदेवर संधी दिल्यास राज्यातील पत्रकारांच्या समस्या ते सोडवू शकतील. तसेच पत्रे हे पदवीधर पत्रकार असून धाडसी व मनमिळावु वृत्तीचे आहेत. त्यांचे राज्यातील ग्रामीण तथा शहरी पत्रकारांशी चांगले संबंध असून, पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मागील १० वर्षापासून ते अहोरात्र झटत असल्याचेही पालिवाल यांनी पत्रात म्हटले आहे.
पत्रकारांमधुनच विधान परिषदेवर पत्रे यांना पत्रकारांच्या मागण्यासाठी संधी द्यावी, अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीच्या राज्यातील जिल्हाध्यक्ष , पदाधिकारी यांच्याकडूनही होत आहे. विशेष म्हणजे, पत्रे हे आमदार झाल्यास त्यांनी कोणतेही भत्ते स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले असून, तसे पत्रही ते देणार आहेत. त्यामुळे पत्रे यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी, असे शेवटी पालिवाल यांनी पत्रात नमूद केले आहे.