कृषि विभाग व डिलर्स असोसिएशनतर्फे मदत सुपूर्द
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतिकार शक्ती चांगली असणा-या व्यक्ती या आजारावर सहज मात करु शकतात. आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुचविलेल्या उपायांमध्ये अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपथी औषधाचा समावेश आहे.
महसूल विभागाला नेहमी प्रत्येक आपत्ती व संकटकाळात अग्रेसर भूमिका बजवावी लागते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुढे येऊन कुठल्याही परिस्थीतीत जबाबदारी पार पाडावी लागते. आरोग्य विभागाबरोबर सुटी न घेता गेल्या तीन महिन्यांपासून सतत महसूल व पोलीस विभागही रात्रं-दिवस अखंडपणे सेवा देत आहेत.
कोरोना आपत्तीच्या काळात शासकीय यंत्रणेसोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून दानशूर व्यक्ती पुढे येऊन मदत केल्यास निश्चीतच थोडया कालावधीत जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करु शकेल. हे लक्षात घेऊन जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर यांनी या राष्ट्रीय कार्यात सहभागी होवून स्वेच्छेने यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन केले होते.
कृषि विभागाने हे आवाहन स्वीकारुन कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांचे नेतृत्वाखाली इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव यांना अर्सेनिक अल्बम ३० या औषधींच्या निर्मीतीसाठी कृषि विभागाचे अधिकारी व कृषि संलग्न निविष्ठा उत्पादक विक्रेते/संघ यांना प्रेरित केले. यामध्ये जळगाव जिल्हा खते, किटकनाशके, बियाणे डीलर्स असोसिएशनचे, अध्यक्ष विनोद तराळ व संचालक शैलेंद्र काबरा यांनी रु. १ लाख २५ हजार आणि रासायनिक खत उत्पादक संघाचे अध्यक्ष नारखेड व संचालक छत्रपती वानखेडे यांनी रु. ५१ हजार तसेच कृषि विभागातील तालुका कृषि अधिकारी, यावल आर. एन. जाधव यांनी १३ हजार ५०० रुपये, तालुका कृषि अधिकारी, धरणगाव अभिनव माळी यांनी ५ हजार रुपये, तालुका कृषि अधिकारी पारोळा, एरंडोल, भुसावळ, ए. पी. वाघ, ए. बी. देसले, कृषी अधिकारी चाळीसगाव यांनी प्रत्येकी १ हजार रुपये स्वेच्छेने मदत केलेली आहे. तसेच जिल्हा परिषद कृषि विभाग तांत्रिक कर्मचारी संघटना, जळगाव यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश देऊन सहकार्य केले.
सदरचा निधी संकलनासाठी कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, मोहीम अधिकारी महाजन व कृषी अधिकारी शिंपी यांचेही सहकार्य लाभले.
मदतीचा धनादेश संबंधितानी गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द केला.