शिवसेना शहरप्रमुख पिंटु बांगर यांचा आरोप; अन्याय खपवून घेणार नाही
यवतमाळ (साथीदार वृत्तसेवा) आपल्या कार्यकर्तृत्वाचा जोरावर शिवसेना खासदार भावना गवळी पाटील पाचव्यांदा संसदेत गेल्या. त्यांचा यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ बळकविण्यासाठी भाजपाने आता ‘ईडी’चे जाळे टाकले आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना खा. गवळी यांना बदनाम करण्यासाठी आज धाडी टाकण्यात आल्या असून सातत्याने सुरु असलेला हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेनेचे यवतमाळ शहरप्रमुख पिंटु बांगर यांनी दिला आहे.
खासदार भावना गवळी यांच्या वाशीम येथील संस्थेशी संबंधीत काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. यासंदर्भात स्वत खासदार गवळी यांनी तक्रारी केल्या आहेत. असे असताना भाजपा नेते किरीट सोमय्या हे नुकतेच वाशिम येथे येऊन त्यांनी खासदार गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावल्यामुळे वाशिम येथील शिवसेनेच्या रोषाचा सामना करावा लागला. पत्रकार परिषद मध्ये सुद्धा पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ते उत्तर देऊ शकले नाही. वास्तविक सात कोटी रुपये चोरी गेल्याची तक्रार स्वत: भावनाताई गवळी यांनीच दिली असल्याने किरीट सोमय्या काही सिद्ध करू शकले नाही. सोमय्या यांना येऊन आठवडा उलटत नाही तोच ईडीच्या अधिका-यांनी धाड टाकून कागदपत्रांची तपासणी केली. या घटनेची माहिती सुध्दा प्रसार माध्यमापर्यन्त पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा सर्व प्रकार मतदारसंघावर ताबा मिळविण्यासाठी तसेच महाराष्ट्र सरकार मध्ये सत्तेत येण्यासाठी सुरु असल्याचा आरोप पिंटु बांगर यांनी केला आहे. खासदार भावना गवळी यांनी लढा ऊभारुन हजारो शेतक-यांना पिकविमा मिळवून दिला. यासाठी त्यांना अनेक आंदोलन करावी लागली. रेल्वेचा प्रश्न लवकर मार्गी लागावा यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. गरीब नागरीकांना न्याय मिळावा यासाठी त्या सातत्याने सरकार दरबारी त्यांची बाजु मांडत असतात. सततच्या सामाजिक कामामुळेच त्या सतत पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहे. अशा परीस्थितीत डाळ शिजत नसल्यामुळे भाजपाचे नेते आता ईडीचा वापर करीत असल्याचा आरोप पिंटु बांगर यांनी केला आहे.
अमृत योजनेची चौकशी केव्हा?
यवतमाळ शहरासाठी 302 कोटींच्या अमृत योजनेचे काम सुरू आहे. या योजनेत मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. निकृष्ट दर्जाचे पाइप वापरण्यात आल्याने 28 किलोमीटर पाईप बदलण्यात आले. अनेक शेतक-यांच्या जमिनी पाईप फुटल्यानंतर खरडून गेल्या. त्यामुळे खासदार भावना गवळी यांनी चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणात केन्द्र सरकारचा पन्नास टक्के निधी उपयोगात येत असल्याने वास्तविक कोटयवधी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याने ईडीमार्फत चौकशी करणे गरजेचे आहे. अशा प्रकरणाकडे लक्ष न देता शिवसेनेच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची सुध्दा ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी पिंटु बांगर यांनी केली आहे.